नाशिकमध्ये साकारणार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने हेल्थ सेंटर

नाशिकमध्ये साकारणार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने हेल्थ सेंटर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या जगावर आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने तिरडशेत येथे गोरगरिबांसाठी हेल्थ केअर सेंटर उभे राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या केंद्रासाठी जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. या केंद्रामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला जाईल.

प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमीत तिरडशेत येथे लतादीदींच्या नावाने या हेल्थ सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये गाेरगरिबांची सेवा केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक असणारी जागा शासनाकडून दिली जाणार आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी नुकताच जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यानुसार तिरडशेतमध्ये जागा निश्चित करण्यात आली असून, तसा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाणार आहे.

भारतरत्न लतादीदींच्या नावाने लवकरच नाशिकमध्ये हेल्थ सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे वृद्ध नागरिक, कलाकार आणि गोरगरीब जनतेसाठी नाशिकमध्ये सुसज्ज असे हेल्थ सेंटर असावे, हे लतादीदींचे स्वप्न साकार हाेणार आहे. जिल्हा प्रशासनाने केंद्रासाठी आडगाव शिवारातील पाच एकर जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांमार्फत शासनास तसा प्रस्तावही गेल्या वर्षी पाठविण्यात आला होता. मात्र, या जागेतून सुरत-चेन्नई महामार्ग जात असल्याने तिरडशेत येथे नवीन जागेचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार उषा मंगेशकर यांनी नुकतीच नाशिकमध्ये येऊन जागेची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक तहसीलदार अनिल दौंडे आणि तहसीलदार (चिटणीस) राजेंद्र नजन उपस्थित होते. उषा मंगेशकर यांनी जागेला होकार दिल्याने प्रशासनाने आता जागेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची तयारी केली आहे.

सुरत-चेन्नई महामार्गामुळे नवीन जागा

नाशिक तालुक्यातील आडगाव येथील गटक्रमांक १९५८, खाते क्रमांक १२९९३ आणि गटक्रमांक १७२५, खातेक्रमांक १२९९२ या जागा अत्यंत योग्य असून, त्या जागा स्वरमाउली फाउंडेशनच्या प्रस्तावित वृद्धालयासाठी मिळाव्यात, असा प्रस्ताव गेल्या वर्षी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मयूरेश पै आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. पण, या जागेतून सुरत-चेन्नई महामार्ग जात असल्याने दुसऱ्या जागेचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते. हा प्रस्ताव सादर करताना वृद्धालयाऐवजी हेल्थ सेंटरची निर्मिती करण्यासाठी जागा मिळावी, असा प्रस्ताव 'स्वरमाउली' कडून देण्यात आला. त्यानुसार नाशिक जवळच्या तिरडशेत येथे जागा देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news