नवी दिल्ली; वृत्तसंस्था : झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने गिरडीह जिल्ह्यातील श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्यामुळे त्याविरोधात देशभरातील जैन धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत. सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र असल्याने सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, त्याला पर्यटनस्थळ घोषित करू नये, असे जैन समाजाचे म्हणणे आहे.
हे तीर्थस्थळ गिरडीह जिल्ह्यातील मधुबन भागात आहे. याला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात. जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्त्व आहे. जैन अनुयायांच्या मते, येथे सुमारे २० तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणूनच हे तीर्थस्थळ जैन समाजाला पूजनीय आहे. सम्मेद शिखरजी सुमारे ९ किलोमीटर परिसरात पसरले आहे.
झारखंड सरकारच्या निर्णयाबाबत जैन समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, श्री सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र आहे. ते पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करू नये. पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यास लोक येथे फिरतील. अन्न, दारू इत्यादी निषिद्ध गोष्टींचा वापर होईल. ज्यामुळे या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य भंग होईल. पर्यावरण मंत्रालयाने वन्यजीव अभयारण्य घोषित करून ते इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ठेवले आहे. त्याचवेळी झारखंडमधील सोरेन सरकारने या तीर्थस्थळाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
सम्मेद शिखरजी हे तीर्थस्थळ जैन समाजाच्या भावनांशी निगडित असल्याने या विषयाचा फेरविचार व्हायला हवा.
– रमेश बैस, राज्यपाल, झारखंड