नगर : जिल्ह्यात 30 लाख रेशनधारकांना मोफत धान्य ; एक वर्षासाठी गोरगरीब जनतेला दिलासा | पुढारी

नगर : जिल्ह्यात 30 लाख रेशनधारकांना मोफत धान्य ; एक वर्षासाठी गोरगरीब जनतेला दिलासा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशनकार्ड धारकांना आता वर्षभर मोफत अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गोरगरिब जनतेला सध्याच्या महागाईत आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील 30 लाख जनतेला होणार आहे. गोरगरिब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे गेल्या काही वर्षांपासून रेशनचे धान्य वितरित करण्यात येते. त्यासाठी स्वस्तधान्य दुकानांत दरमहा धान्य मानसी गहू, साखर वाटप केले जात होते. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मानसी प्रतिकिलो 3 रुपये दराने तांदूळ, 2 रुपये दराने गहू व 1 रुपये दराने भरडधान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार राज्यभरातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा स्वस्तधान्य वाटप केले जात आहे.

जिल्ह्यातील जवळपास 29 लाख 37 हजार 646 गोरगरिब जनतेला दरमहा धान्य वितरित केले जात आहे. कोरोनाच्या कालावधीत गोरगरिब जनतेला केंद्र सरकारतर्फे दरमहा मोफत अन्नधान्य दिले जात होते. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दरमहा दोनदा धान्य उपलब्ध होत होते. केंद्र सरकारने आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत रेशनकार्डधारकांना दरमहा मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेला दरमहा मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महागाईच्या काळात जनतेला दिलासा मिळणार आहे. मोफत धान्य वितरित करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या विभागामार्फत नियोजन सुरू आहे.

Back to top button