औरंगाबाद : वऱ्हाडींवर काळाचा घाला, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार, १४ जण गंभीर जखमी | पुढारी

औरंगाबाद : वऱ्हाडींवर काळाचा घाला, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार, १४ जण गंभीर जखमी

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड शहरानजीक असलेल्या मोढा फाट्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला घाटशेंद्रा येथून लग्नाहून परतत असलेल्या वऱ्हाडींच्या पिकअपने धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्या ठिकाणी पोलिस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील सोनवणे कुटुंबीय कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे लग्नाला गेले होते. बुधवारी ( दि.२९ ) रोजी रात्री ७ वाजता लग्न पार पडले. लग्नानंतर लग्नाची सर्व विधी कार्यक्रम उरकून रात्री १ वाजण्याच्या सुमारास सदरील मंडळी गावाकडे परत येत होती.

याच दरम्यान सिल्लोड शहरानजीक असलेल्या मोढा गावाजवळील फाट्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला वऱ्हाडींची पिकअप धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ वऱ्हाडी जागीच ठार तर इतर १४ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात अशोक संपत खेळवणे (वय ५२), संगीता खेळवणे (वय ३५ ), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (वय ४५), संजय संपत खेळवणे (वय ४२), जिजाबाई गणपत खेळवणे (वय ६०), रंजनाबाई संजय खेळवणे (वय ४०) असे एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार झाल्याची नावे आहेत. तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button