बेळगाव : एकसंबा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता; भाजपचा मोठा पराभव | पुढारी

बेळगाव : एकसंबा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता; भाजपचा मोठा पराभव

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या तालुक्यातील एकसंबा नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळविली आहे. चिकोडी तालुक्यातील एकसंबा नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी काँगेसने 16 जागा मिळवून झेंडा फडकाविला आहे. तर सताधारी भाजपाला मात्र केवळ 1 जागा मिळविता आली आहे.

एकुण 17 पैकी केवळ 1 भाजपचा उमेदवार विजयी

चिकोडी शहरातील मिनिविधानसौध येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी पार पडली. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत निकाल हाती आलेल्या वॉर्ड 1,2, 3 4 वर काँग्रेसने विजयाची सुरुवात केली. त्यांनंतर आलेल्या सर्व वॉर्डचा निकाल काँग्रेस उमेदवारांच्या बाजूने लागला. एकुण 17 पैकी केवळ 1 भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. तर तोही अवघ्या चार मतांनी निवडून आला आहे.

काँग्रेस पक्षाचे 16 उमेदवार विजयी

तर काँग्रेस पक्षाचे 16 उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी आमदार गणेश हुकेरी यांना खांद्यावर घेऊन विजयोत्सव साजरा करण्यात आला. एकसंबा हे गाव माजी खासदार प्रकाश हुकेरी, आमदार गणेश हुकेरी व राज्याच्या धर्मदाय, वक्फ व हज खात्याचे मंत्री सौ. शशिकला जोल्ले व चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोले यांचे गाव होय. पूर्वी ग्राम पंचायत असलेल्या एकसंबाला 2016-17 साली नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यानंतर झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत जोल्लेच्या नेतृत्वाखाली भाजपने सता काबीज केली होती. यावेळी भाजपने 12 तर काँगेसने 5 जागा मिळविल्या होत्या. यामुळे 30 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकसंबा ग्राम पंचायत भाजपाच्या ताब्यात गेली होती. त्यांनंतर यंदा दुसरी नगरपंचायत निवडणूक पार पडली. यंदा काँग्रेस व भाजपाने प्रत्येक वॉर्डात तुल्यबळ उमेदवार देऊन आपलीच सता आणण्यासाठी साम, दंड, भेद या वापर झाला होता.

विशेष म्हणजे एकसंबा नगरपंचायतीसाठी जोल्ले व हुकेरी घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले होते. एकूण 17 पैकी काँग्रेसचे 16 उमेदवार विजयी झाल्याने एकसंबा नगरपंचायतीवर एकतर्फी सता हाती आली आहे. पण दुसरीकडे सताधारी भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे.

विकासाचा विजय : गणेश हुकेरी

यावेळी आमदार गणेश हुकेरी म्हणाले की एकसंबा नगरपंचायत कारभार चालविण्यास भाजप पूर्णपणे अपयशी ठरली होती. शहराचा विकास न करणे, निष्क्रिय प्रशासनाने नागरिक कंटाळले होते. आम्ही मात्र शहराच्या विकासासाठी हवे ते सर्व प्रयत्न केले आहेत. यामुळे नागरिकांनी आम्ही राबविलेल्या विकास कामाला पाठिंबा दिला आहे. हा विजय विकासाच्या बाजूने असल्याचे त्‍यांनी सांगितले.

हे वाचा :

Back to top button