सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज मतदान, १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज मतदान, १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा: कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी गाजली आहे. या निवडणुकीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. संतोष परब हल्ला प्रकरण आणि याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा यामुळे या निवडणुकीत राजकीय घमासान सुरू आहे. आता या निवडणुकीचा प्रचार थांबला असून, गुरुवारी 30 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आपले मतदार पळवले जाऊ नयेत, गायब केले जाऊ नयेत यासाठी काही उमेदवारांनी काही मतदारांना सुरक्षितस्थळी ठेवले आहे. गुरुवारी सकाळी या मतदारांना मतदान केंद्रांवर थेट आणले जाण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदान शांततेत व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रयत्न करत आहेत.

जिल्हा बँकेच्या एकूण 19 जागांसाठी 39 उमेदवार आपले भवितव्य अजमवणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 981 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यांतील तहसीलदार दालनात मतदान होणार आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ‘सिध्दीविनायक सहकार पॅनल’ विरूध्द शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत ‘सहकार समृध्दी पॅनल’मधील ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये येथून निवडणूक कर्मचारी साधनसामुग्रीसह बुधवारी पोलिस बंदोबस्तात रवाना झाले.

आठही केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी रवाना

30 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायं.4 वा. या वेळेत जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमधील मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. बुधवारी सकाळी सिंधुदुर्गनगरी येथील शिक्षक पतपेढी हॉल येथून एक केंद्राध्यक्ष, तीन साहाय्यक, दोन शिपाई व एक पोलिस असे प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी सात जण मतपेटी, मतपत्रिका व अन्य साहित्यासह 56 अधिकारी व कर्मचारी, पोलिस मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button