पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेवर 9/11 चा हल्ला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला समजला जातो. या हल्ल्याचा उल्लेख जरी केला तरी थरकाप उडतो. अशाच प्रकारचा हल्ला करण्याची धमकी दहशतवाद्यांनी सिंगापूरला दिली आहे. सिंगापूर हा इस्लाम द्वेष करणारा देश असल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळेच त्यांना ही धमकी देण्यात आल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत तुमच्यावरही हल्ला करू, असे इस्लामिक धर्मोपदेशकाच्या समर्थकांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिंगापूरच्या गृहमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इंडोनेशियन धर्मोपदेशक अब्दुल सोमाद बटूबारा यांना गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये येण्यास बंदी घातली होती. तरी सोमाद आणि त्याच्यासोबत इतर सहा लोक 16 मे रोजी सिंगापूरमध्ये आले होते, परंतु तेथे त्यांना प्रवेश दिला नाही. त्यांनतर मात्र त्यांच्या समर्थकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
गृहमंत्री पुढे म्हणाले, सोमाद यांच्या समर्थकांनी सिंगापूरवर इस्लाम द्वेष करणारा देश असा आरोप केला आहे. त्यामुळे मुस्लिम आणि इंडोनेशियातील जनतेची सिंगापूरने माफी मागावी आणि त्यासाठी 48 तासांचा कालावधी देण्यात येत आहे. अन्यथा 9/11 सारखा हल्ला सिंगापूरवर करू अशी सोशल मीडियावरून धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इंडोनेशियातील सिंगापूरच्या राजदूताची हकालपट्टी करण्यात येईल, असेही धमकीत म्हटल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा