जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लग्न समारंभ म्हटले की, मानापानावरून नातेवाइकांचे रुसवे-फुगवे आलेच. यावरून अनेकदा वादही उद्भवतात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथे लग्नात मावसभावाने मानापानावरून रागातून बालविवाहाची माहिती बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तत्काळ अर्जाद्वारे देऊन विवाह रोखला.
यावल तालुक्यातील साकळी येथे सोमवारी (दि. २३) १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे (२७) यांचा विवाह होणार होता. मात्र वधूचा मावसभाऊ रवींद्र शालिक सोनवणे यांनी लग्नात मानपान मिळाला नाही. याचा राग येऊन महिला व बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे बालविवाहासंदर्भात अर्ज दिला. या अर्जाची तत्काळ दखल घेत पर्यवेक्षिका कल्पना तायडे व साकळी अंगणवाडीच्या सेविका मंगला नेवे यांनी विवाहस्थळी भवानी माता मंदिर सभागृह येथे जाऊन बालविवाह रोखला.
वधू-वर मंडळींचा जाब-जबाब : महिला व बालविकास प्रभारी अधिकारी यांनी यावल पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्या मदतीने बालविवाह रोखला. वधू-वर मंडळाच्या लोकांना पोलिस ठाण्यात बाेलावून मुलगी अल्पवयीन असल्याने, विवाह लागल्यास तुमच्यावर गुन्हे नोंदविण्यात येतील, अशी समजूत काढण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या मंडळींचे जाब-जबाब घेतल्यानंतर मंडळी आपापल्या गावी निघून गेली.