अमरावती, पुढारी वृत्तसेवा अमरावतीत राजापेठ उड्डाण पुलावर दुचाकी आणि मिनी ट्रक यांच्यामध्ये (सोमवारी) भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असलेल्या नखेगाव येथून तीन विद्यार्थी हे अमरावतीत पोटे कॉलेजमध्ये आले होते. कॉलेजमध्ये ॲडमिशन फॉर्म घेऊन विद्यार्थी गावाकडे परत दुचाकी क्रमांक एम एच २७ ए एक्स ८५ ९२ ने जात होते. दरम्यान राजापेठ उड्डाणपूल मार्गावरून जात असताना एका टेम्पोने यू टर्न घेतला असता दुचाकी चालक विद्यार्थ्याने ब्रेक लावला. या दरम्यानच मागून येणाऱ्या मालवाहू मिनी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातात पियुष तुकाराम राठोड (वय १८) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे मित्र आदित्य पांडुरंग राठोड (१८) व ओम देवानंद कुरडे (१८) हे दोघे जखमी आहेत. तीनही विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात येणाऱ्या नखेगाव येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी ट्रक क्रमांक एम एच ४६ ई ३११० च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :