पुणे : पुढारी वृत्तसेवा : घटना घडल्यानंतर सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या अहवालात अल्कोहोल आढळलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात या दोन अहवालांवरून खटल्याची दिशा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. अल्पवयीन आरोपी मद्य पिऊन कार चालवत होता, असा मुद्दा पुढे आला होता. तसे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले. अल्पवयीन मुलाला अपघातानंतर ससून रुग्णालयात 9 वाजता नेऊन 11 वाजता रक्ताचे नमुने घेण्यात आले.
त्यानंतर अपघाताची बातमी वार्यासारखी सर्वत्र पसरली. यामध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याबाबत माध्यमांवर चर्चा रंगली होती. एकीकडे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना दुसरीकडे पोलिसांनी पर्याय म्हणून मुलाचे औंध येथील रुग्णालयात रक्ताचे नमुने घेतले होते. रक्ताच्या अहवालाबाबत बोलले जात असताना दोन्ही अहवाल रविवारी पोलिसांना मिळाले. त्यामध्ये दोन्ही अहवाल नेगेटिव्ह आल्याचे निदर्शनास आले. पहिले रक्त साडेआठ तासानंतर, तर दुसरे रक्त सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास म्हणजे अठरा तासांच्या कालावधीने घेण्यात आले.
हेही वाचा