बाबा लगीन लावून द्या म्‍हणत दोघा मुलांनी केली बापाची निर्घुण हत्‍या | पुढारी

बाबा लगीन लावून द्या म्‍हणत दोघा मुलांनी केली बापाची निर्घुण हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बाबा लगीन लावून का देत नाही’ असे म्हणत दोन मुलांनी बापावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा गुरूवारी (दि. २३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी येथे ही धक्कादायक घटना ८ मे रोजी घडली होती. संपत लक्ष्मण वाहूळ (वय ४८) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी पोपट वाहूळ (वय २८) आणि प्रकाश वाहूळ (वय २६) या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वडगाव कोल्हाटी येथे संपत वाहूळ हे आपल्या कुटुंबासह राहत होते. पोपट आणि प्रकाश ही त्यांची मुले एका कंपनीत कामाला होती. ८ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता संपत यांना तुम्ही आम्हाला शेती वाटून का देत नाही, लग्न का लावून देत नाही, असे म्हणत लहान मुलाने शिवीगाळ केली. नंतर बुटाने मारहाण सुरू केली. त्याचवेळी मोठा मुलगा आला, त्यानेही आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, वय वाढत आहे, असे म्हणत मारहाण सुरू केली. मुले मारहाण करत असताना वडिल मात्र मुलांना ‘तुम्ही पहिला व्यवस्थित वागा, तुमची वागणूक नीट नाही,’ असे सांगत होते. वडिलांचे हे उत्तर ऐकुन दोन्ही मुलांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट चाकूने त्यांच्यावर वार केले.

एका मुलाने पकडले दुसऱ्याने चाकूने भोसकले

मुलांच्या मरहाणीतून जीव वाचवण्यासाठी वडिलांनी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र लहान मुलाने त्यांना पकडले, तर मोठ्या मुलाने जवळील चाकू काढला आणि त्यांच्यावर वार केले. त्यांचा आरडा ओरडा ऐकून त्यांचे भाऊ, पुतण्या मदतीला धावून आले. त्यांनी मुलांच्या तावडीतून सोडवून घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोपट आणि प्रकाश या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button