Nashik Crime News | एमडी तस्कर पगारे, पिवाल टोळीवरील मोक्का नाकारला | पुढारी

Nashik Crime News | एमडी तस्कर पगारे, पिवाल टोळीवरील मोक्का नाकारला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात एमडीची तस्करी करून त्याची विक्री करणाऱ्या सनी पगारे व अर्जुन पिवाल टोळीतील गुन्हेगारांवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाने या टोळीवरील मोक्का नामंजूर केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पगारे-पिवाल टोळीवरील एमडी तस्करीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे.

तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात पदभार सोडण्यापूर्वी नाशिकमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना दणका देण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. शहर पोलिसांनी संशयित गणेश शर्मा, गोविंदा साबळे, आतिश उर्फ गुड्ड्या चौधरी, सनी पगारे, सुमित पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण उर्फ राजा मोरे, मनोहर काळे, वैजनाथ हावळे, प्रथमेश मानकर, उमेश व अमोल वाघ, अक्षय नाईकवाडे, भूषण मोरे या संशयितांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. मोक्काचा तपास तत्कालीन सहायक आयुक्त आनंदा वाघ यांनी केला होता. गुन्हे शाखा युनिट एक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने या टोळीतील सदस्यांचे कारनामे उघड केले. या संशयितांनी सोलापूर येथे कारखाना सुरू करून एमडी तयार केले होते. तसेच हा एमडी साठा नाशिकसह इतरत्र विक्रीसाठी उपलब्ध केला होता. पोलिसांच्या कारवाईत सोलापूरमधून 150 किलोहून अधिक वजनाचा एमडी साठा व एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. संशयितांचे महाराष्ट्रासह हैदराबाद व केरळपर्यंत धागेदोरे उघड झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र मोक्कांतर्गत कारवाई करण्याइतपत ठोस पुरावे नसल्याने त्यांचा मोक्का नामंजूर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी केलेली कारवाई
सप्टेंबर २०२३ मध्ये नाशिक रोड पोलिसांनी सामनगाव परिसरात संशयित गणेश शर्मा याला १२.५ ग्रॅम एमडीसह पकडले होते. ऑक्टोबर महिन्यात शिंदे गावात एमडीचा कारखाना सापडल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. त्यावेळी गणेशला एमडी पुरवणाऱ्या गोविंदा व आतिश यांना ताब्यात घेतले. एनडीपीएस व गुन्हे युनिट एकच्या पथकाने या साखळीतील मुख्य सूत्रधार सनी पगारे व अर्जुन पिवाल यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीत सनीने सोलापुरात एमडीचा कारखाना व गोदाम सुरू केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एकूण १५ संशयितांना पकडले होते.

हेही वाचा:

Back to top button