Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला १७० कर्मचाऱ्यांची दांडी; कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा | पुढारी

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला १७० कर्मचाऱ्यांची दांडी; कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा

देगलूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने देगलूर- बिलोली विभानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आज (दि.२९) उदगीर येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात प्रथम प्रशिक्षण पार पडले. यासाठी एकूण १ हजार ७५२ कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ५८२ कर्मचारी उपस्थित होते तर प्रशिक्षणाला १७० कर्मचारी गैरहजर होते. (Loksabha Election)

प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडे खुलासा मागितला जाणार आहे. खुलासा योग्य वाटला नाही तर त्यांच्यावर सरळ गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बिलोलीचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिला आहे.

आज (दि.२९) देगलूर शहरातील उदगीर रोडवरील सिध्देश्वर मंगल कार्यालय येथे १ हजार ७५२ केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण सकाळी ०९ ते ५ :३० या कालावधीत पार पडले. या प्रशिक्षणासाठी देगलूर – बिलोली विधानसभा क्षेत्रातील एकूण ३४८ मतदान केंद्राचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.

या प्रथम प्रशिक्षणासाठी पुरूष १ हजार ४३४ पुरूष व ३०६ महिला तर १२ दिव्यांग अशा एकूण १ हजार ७५२ कर्मचाऱ्यांमध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचा समावेश होता. नांदेड लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बिलोली सचिन गिरी तसेच बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे आदींनी उपस्थित कर्मचाऱ्यांना पी.पी.टी.च्या माध्यमातून साहित्य हस्तगत करण्यापासून साहित्य परत करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले. (Loksabha Election)

याशिवाय प्रत्यक्ष मतदान यंत्र कशाप्रकारे हाताळावयाचे याचे प्रशिक्षण तज्ञ ट्रेनर तथा क्षेत्रिय अधिकारी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच कर्मचाऱ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. याप्रसंगी प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा देगलुरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे, देगलूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार संजय नागमवाड, बिलोलीचे नायब तहसीलदार दिपक मरळे, नायब तहसीलदार राम पंगे, नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड, नायब तहसीलदार रघुनाथ सिंह चौव्हाण, गटशिक्षणाधिकारी दिगंबर तोटरे आदी अधिकाऱ्यांसह संतोष हुंडे, हणमंत नुकलवार,किशोर महिंद्रकर,बोधने, अनिल दुगाणे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान या प्रथम प्रशिक्षण प्रसंगी अपेक्षित असलेल्या १७५२ कर्मचाऱ्यांपैकी १५८२ कर्मचारी हजर होते तर १७० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम नोटीस देण्यात येणार आहे. या नोटीसींचा खुलासा जर योग्य वाटला नाही तर सदर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सरळ गुन्हे दाखल करण्यात येतील. असा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर इशारा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडू नये यासाठी आणखी नव्याने विविध शाळा, संस्थांतील कर्मचाऱ्यांची यादी मागवली जाणार असून त्यांना देखील प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button