हिंगोली : संत्र्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी | पुढारी

हिंगोली : संत्र्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात संत्री घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आज (सोमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अमरावतीकडून एका ट्रकमध्ये संत्र्याचे कॅरेट भरून ट्रक नांदेडकडे जात होता. आज सोमवार सकाळी ट्रक आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात आला असतांना भाटेगाव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील संपूर्ण कॅरेट खाली पडल्याने रस्त्याच्या बाजूला संत्र्याचा सडाच पडल्याचे चित्र होते.

या अपघाताची माहिती मिळताच भाटेगाव येथील गावकरी व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी ट्रकमधील जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. तर ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी ट्रकमधील कागदपत्रे व मृताच्या खिशातील कागदपत्रांची पाहणी करून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र कागदपत्रावरून नाव समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी ट्रक मालकास या घटनेची माहिती दिली आहे. ट्रक मालक आल्यानंतरच मृताचे नाव स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.

हेही वाचा : 

Back to top button