Bachchu Kadu on Amravati | …तर ‘महायुती’तून बाहेर पडू, बच्चू कडूंचा इशारा, राणांच्या उमेदवारीला विरोध | पुढारी

Bachchu Kadu on Amravati | ...तर 'महायुती'तून बाहेर पडू, बच्चू कडूंचा इशारा, राणांच्या उमेदवारीला विरोध

पुढारी ऑनलाईन : महायुतीत असलेले ‘प्रहार’चे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ३ एप्रिलला प्रहार अमरावतीतून अर्ज भरेल. आमचा निर्णय पक्का आहे, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महायुती मान-सन्मान ठेवत नसेल तर आम्ही बाहेर पडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीसोबत आमचे काही बोलणे झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. ते ‘पुढारी न्यूज’शी बोलत होते. (Bachchu Kadu on Amravati)

बच्चू कडू यांनी वर्ध्यातून लढण्याचे संकेतही दिले आहेत. आपल्या कार्यकर्त्याकडून वर्ध्यातून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात आहे. नवनीत राणांचा प्रचार करु नये अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी (२४) सायंकाळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार कडू यांना फोन करून मुंबईत भेटीचे निमंत्रण दिले आहे. या संदर्भात बच्चू कडू यांनी रविवारी सायंकाळी प्रसार माध्यमांना माहिती दिली होती. येत्या २६ तारखेला आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला जाणार आहोत. पण आमचा मान- सन्मान समजून घेतला नाही आणि आम्हाला विचारात घेतले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू. जिथे चांगले उमेदवार आहेत तिथे त्यांना पाठिंबा देऊ आणि चांगला उमेदवार आम्हाला मिळाल्यास तिथे त्याला आमच्या पक्षाच्या चिन्हावर उभे करू, अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली.

राणा दाम्पत्यावर निशाणा

त्यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. पैशाचा आणि सत्तेजा माज म्हणजे राणा आहे, अशा शब्दांत त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. भाजप कार्यकर्तेदेखील राणा यांच्याविरोधात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीचे घटक असलेल्या बच्चू कडू यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. रवी राणा यांनी यापूर्वी महायुतीतील घटक पक्षांसंदर्भात केलेले वक्तव्य आणि आरोपांमुळे कार्यकर्ते संतप्त आहेत तसेच जिल्ह्यात आमचे दोन आमदार असूनही भाजप आम्हाला विचारात घेत नसल्याची नाराजी बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. (Bachchu Kadu on Amravati)

हे ही वाचा :

 

Back to top button