Railway News | भारतीय रेल्वे सुसाट; रद्द वेटिंग तिकिटामुळे मिळालेय घसघशीत उत्पन्न | पुढारी

Railway News | भारतीय रेल्वे सुसाट; रद्द वेटिंग तिकिटामुळे मिळालेय घसघशीत उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनानंतर रेल्वेप्रवासाने आता पुर्णपणे वेग पकडला आहे. भारतीय रेल्वेच्या तिकीट उत्पन्नात प्रचंड वाढ झालेली आहे. परंतु वेटिंग तिकिट रद्द केल्याने भारतीय रेल्वेची चांदी झाली आहे. वर्ष २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीत भारतीय रेल्वेने रद्द केलेल्या वेटिंग तिकिटांमुळे तब्बल १ हजार २२९ कोटी ८५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

मध्य प्रदेश येथील आरटीआय कार्यकर्ते विवेक पांडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर रेल्वे मंत्रालयाने उत्तर दिले. या उत्तरातून रेल्वेल्या रद्द तिकीटांमधून मिळणारी कमाई वर्षानुवर्षे वाढत असल्याचे दिसून येते.

किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी मेल-एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. नागरिक मेल-एक्सप्रेसच्या प्रवासासाठी आरक्षित तिकिट मिळाले नाही तर वेटिंग तिकिट काढतात. परंतु अनेकदा वेटिंग तिकिट कन्फर्म होत नाही किंवा काहीवेळा वैयक्तिक कारणास्तव प्रवासी प्रवास करीत नाहीत. अशा वेळी प्रवासी वेटिंग तिकिट रद्द करतात.

वेटिंग तिकिट रद्द केल्यावर रेल्वेकडून मूळ तिकीट किमतीच्या काही प्रमाणात शुल्क आकारणी केले जाते. या शुल्क आकारणीमुळे रेल्वेला आर्थिक फायदा होतो. वर्ष २०२१ मध्ये, वेटींग लिस्टमधील एकूण २ कोटी ५३ लाख तिकिटे रद्द करण्यात आली. यातून रेल्वेला २४२ कोटी ६८ लाख रुपयांची कमाई झाली. २०२२ मध्ये रद्द केलेल्या ४कोटी ६ लाख तिकिटांमधून रेल्वेच्या तिजोरीत ४३९ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला. २०२३ मध्ये वेटिंग लिस्टमधील ५ कोटी २६ लाख तिकिटे रद्द झाल्याने रेल्वेला ५०५ कोटीचे उत्पन्न मिळाले. जानेवारी २०२४ या महिन्यात ४५ लाख ८६ हजार तिकिटे रद्द झाली. त्यातून रेल्वेला ४३ कोटी रुपयांची कमाई मिळाली.

दिवाळीत सर्वाधिक तिकिटे रद्द
गेल्या वर्षी ५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या आठवड्यात ९६लाख १८ हजार तिकिटे रद्द झाली होती.या आकडेवारीमध्ये कन्फर्म , आरएसी आणि वेटिंग लिस्टमधील तिकिटे रद्द करणाऱ्यांचा समावेश आहे. रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमवर प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, वेटिंग लिस्टमधील ९६ लाख १८ हजार रद्द तिकीटांपैकी ४७ लाख ८२ हजार तिकीटे ही सर्व कोट्यातील होती. दिवाळीदरम्यान वेटींग लिस्टमध्ये ज्यांचा फायनल स्टेटस वेटींग असा होता त्या सर्व रद्द तिकिटांमधून रेल्वेने १० कोटी ३७ लाखांची कमाई केली.

रद्द शुल्कात दुप्पट वाढ
नोव्हेंबर २०१५ पासून तिकिट रद्द केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली. यानुसार एसी ३ टायरचे तिकिट ४८ तासांपूर्वी रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारले जाते. नोव्हेंबर २०१५ आधी यासाठी ९० रुपये इतके शुल्क होते. यासोबतच एसी २ टायरचे तिकिट रद्द केल्यावर नोव्हेंबर २०१५ पासून २०० रुपये शुल्क आकारले जाते. याआधी यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जात होते. आधी स्लिपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द करण्यात आल्यावर ६० रुपये शुल्क आकारणी केली जात होती. आता यासाठी १२० रुपये इतके शुल्क आकारले जाते. तर सेकंड क्लासमधील तिकिट रद्द करण्यात आल्यावर आकारले जाणारे शुल्क ३० रुपयांवरुन ६० रुपये केले आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे.

सेवा शुल्काचा बोजा
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे ऑनलाइन खरेदी केलेल्या ई-तिकीटांवर देखील सेवा शुल्क आकारले जाते. परंतु तिकिट रद्द केल्यावर परतावा मिळत नाही. यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी पेमेंट पद्धतीनुसार सेवा शुल्क १० ते ३० रुपयांच्या दरम्यान असते.

हेही वाचा:

Back to top button