‘मला उद्धव ठाकरेंची कीव येते’ : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

'मला उद्धव ठाकरेंची कीव येते' : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची कीव येत असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेजी, हेच आहेत ना तुमचे मित्र आणि नवे नेते.. सावरकरांचा अपमान तुम्ही मिंधे होऊन सहन केला. आता भारतमाता, प्रभू श्रीराम, रामायण आणि हनुमानाचा अपमान तुमचे निर्लज्ज सवंगडी करू लागले. यासाठीच तुम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली, बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब लिहू दिले. अरेरे, तुमच्याबद्दल आता कीव येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

हा कसला राजा हा तर भिकारी !

द्रमुक पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री ए. राजा याचे विचार त्यांच्या नावाप्रमाणे नाहीत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून, “हा कसला राजा हा तर भिकारी!” या शब्दात हल्लाबोल केला आहे. एक्स या सोशल मीडियावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ए. राजा यांनी एका जाहीर सभेत, भारत हे एक राष्ट्र नाही, मला राम किंवा रामायण माहिती नाही. माझा त्यावर विश्वास नाही. ‘भारतमाता की जय’ बोलावं लागेल, ‘जय श्रीराम’ म्हणणार नाही अशी वादग्रस्त मुक्ताफळे उधळून भारतीयांच्या भावनांवर मीठ चोळले.

या निंदनीय प्रकारावर बावनकुळे म्हणाले, भारत हे एक राष्ट्र नाही, अशी भारतविरोधी भूमिका, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा कधीच स्वीकार करणार नाही, ही राक्षसी महत्वाकांक्षा आणि राम किंवा रामायणावर विश्वास नाही. द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे.

ए. राजा यांच्या विधानावरून त्यांनी इंडी आघाडींच्या नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे दिवटे कर्नाटकचे मंत्री प्रियांक करतात. सनातन हिंदू धर्माचा अपमान इंडी आघाडीतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी करतात. ए. राजा यांनी तर हद्दच केली. राष्ट्रविरोधी विधान करून आमचे आराध्य प्राणप्रिय प्रभू श्रीराम, रामायण आणि महावीर हनुमंताचे अस्तित्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला असे टीकास्त्र सोडले.

हेही वाचा

Back to top button