Nashik Fraud News : बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक | पुढारी

Nashik Fraud News : बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विभागीय माहिती कार्यालयात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या राजू चौघुलेने कार्यालयातील कागदपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करीत कर्ज प्रकरण करत बँकेसह कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक संचालक मोहिनी राणे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित चौघुलेविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

राणे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित चौघुलेने डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकार केला. चौघुलेने मंत्रालय को-ऑप. बँकेच्या नाशिक शाखेकडे १० लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केले होते. त्यासाठी विभागीय माहिती कार्यालयाकडील लेटरहेड, शिक्का, पदनामाचा स्टॅम्प यांचा वापर चौघुलेने केला. तसेच राणे यांच्या नावाची बनावट मिळतीजुळती स्वाक्षरी करून कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता. दरम्यान, राणे यांना या कर्जप्रकरणाचा संदेश आल्यानंतर त्यांनी त्याची खात्री केली. त्यावर त्यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात आले. तसेच सखोल चौकशी केली असता, जावक क्रमांकाची शहानिशा केल्यानंतर तो क्रमांक कार्यालयाचा नसल्याचे उघड झाले. कार्यालयाकडून चौघुलेच्या कर्ज मंजुरीबाबत कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चौघुलेने कर्ज मंजुरीसाठी कार्यालयातील कागदपत्रे, शिक्के यांचा वापर करून व राणे यांची खोटी स्वाक्षरी करून कार्यालयासह बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button