पनवेल ः विक्रम बाबर : पनवेल शहरात ड्रग्जची बेकायदा विक्री करणार्या, दोन तरुणांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल शहरातून अटक करून सुमारे 8 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले हे दोन्ही तरुण पनवेल शहरातील टपाल नाका आणि फॉरेस्ट कॉलनी परिसरातील रहिवाशी आहे. यापैकी एकजण उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगीतले. ओंकार संजय खुटले (वय 23 रा. टपाल नाका, पनवेल) आणि ललित सुनील पवार (वय 24 रा. बालाजी आंगण फॉरेस्ट कॉलनी पनवेल) असे अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण ड्रग्ज विक्रेते आहेत.
संबंधित बातम्या
ओंकार खुटले याचा मुळ व्यवसाय भाजी विक्रिचा असून त्या व्यवसायाच्या नावाखाली ओंकार चक्क ड्रग्जची विक्री करत होता. आणि हे ड्रग्ज मिळवून देण्यासाठी ओंकारला ललित पवार मदत करत होता. या दोघांना बुधवारी नवी मुंबई पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल शहरातून अटक केली आहे. पनवेल शहरातील हॉटेल सम्राट परिसरात
काही अज्ञात व्यक्ती ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक संजय फुलकर यांना मिळाली होती. ही माहिती त्यांनी त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांना दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पनवेल शहरात सापळा रचला. त्यावेळी एक माणूस खासगी गाडी घेऊन रस्त्याच्या बाजूला उभा राहिला पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीकडे एलसीडी पेपर अमली पदार्था सारखे पदार्थ मिळून आले.
मिळालेले पेपर हे ड्रग्ज असल्याची खात्री झाल्यानंतर, हे ड्रग्ज कुठून आणले याची चौकशी केली असता पनवेल मध्ये राहणार्या ललित सुनील पवार यांनी ते दिल्याची माहिती त्याने दिली. त्या नुसार पवार राहत असलेल्या सोसायटीमधून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कडून अधिक चौकशी केली असता हे ड्रग्ज गोवा राज्यामधून येत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
काही मित्र मंडळींच्या संगतीमुळे ललित पवार याला नशेचा नाद लागला. हा नाद पूर्ण करण्यासाठी, पवार हा अांतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने तो स्वतः ड्रग्ज विकू लागला होता. ड्रग्स विकताना त्याने स्वतः आपले नशेचे व्यसन सुरू ठेवले होते. हे सर्व ड्रग्ज त्याला गोवा येथून येत असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत होते.