

उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : पतीच्या हत्येसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने 30 लाखांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोणताही धागादोरा नसताना देखील पोलिसांनी दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्थानकात सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपीना अटक करण्यात केली.
संबंधित बातम्या
अंबरनाथ-बदलापूर रोडवर झालेल्या इसमाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. मात्र सदर हत्या घडवून आणण्यासाठी एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तीन जणांना तब्बल 30 लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले आहे.
मयत रमेश झा हा नोकरीनिमित्त अंबरनाथ शहरात राहत होता. त्याची पत्नी सुमन झा ही आपल्या मुलांसह दिल्ली येथे राहत होती. 25 फेब्रुवारी रोजी रमेश झा याचा मृतदेह अंबरनाथ-बदलापूर रोडवरील पेट्रोलपंप जवळ आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला.
या घटनेचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील सुरू करण्यात आला होता. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 47 तासांच्या आत या हत्येचा उलघडा करण्यात यश मिळवले आहे.
रमेश झा यांची हत्या करून आरोपी दिल्ली येथे पळून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्थानकात फिल्मी स्टाईल सापळा रचून थरारक पाठलाग करत चार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अटक केलेल्या आरोपीमध्ये सुमन झा, दीपक कुमार, संजय कुमार आणि संतोष गुप्ता यांचा समावेश आहे. आरोपी सुमन झा या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती रमेश याच्या हत्येसाठी तब्बल 30 लाखांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेत एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा देखील शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी अटक केलेल्या आरोपींना अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजते.