मुंबई, पुढारी ऑनलाईन : विधीमंडळाच्या लॉबीत शुक्रवारी शिंदे गटातील कर्जदचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भूसे आपआपसात भिडले. या दोघांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाल्याचे कळते. आमदार थोरवे यांचे मतदारसंघातील रस्त्याचे काम होते. यावरुन त्यांचा दादा भूसे यांच्याशी वाद झाल्याचे समजते. दरम्यान, या दोघांमधील वाद सोडवण्यासाठी मंत्री शंभुराज देसाई यांनी मध्यस्थी केली. दोघांच्यात वाद झाला नसल्याचा दावा शंभुराज देसाई यांनी केला.
दोघे एकमेकांना भिडले, वाद झाला, असे काहीच घडले नाही. मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का?. असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला. "मी दोघांनाही लॉबीत घेऊन गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. उद्या आमदारांचे काम कसे मार्गी लावता येईल. यावर आम्ही चर्चा करु. त्यांचे काम मार्गी लावू. दोघांबरोबर मी होतो. दोघांच्यात वाद अथवा धक्काबुक्की झाली नाही," असे त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर बोलणे टाळले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, राज्यात गुंडाराज सुरु असल्याची टीका केली आहे. सत्ताधारी आमदारांचा राडा होणे दुर्देवी आहे. त्यांना जनतेशी काही देणेघेणे नाही. सरकारचं गँगवार सभागृहात पोहोचले आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा :