Chhagan Bhujbal : तुकारामांमुळे समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर | पुढारी

Chhagan Bhujbal : तुकारामांमुळे समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा – ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा त्यांंनी दूर केला, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मखमलाबादला श्रद्धा लॉन्स येथे श्रीमंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान, पुणे आयोजित वारकरी, भक्तांचा मेळावा व सत्कार तसेच ‘अभंग पंचविशी’ प्रकाशन व ग्रंथदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिक कोकाटे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, हभप रामकृष्ण महाराज लहवितकर, हभप डॉ. रामकृष्णदास महाराज, हभप त्र्यंबकदादा गायकवाड, वक्ते शेख सुभान आली, अविनाश काकडे, नानासाहेब महाले, विष्णूपंत म्हैसधूने, निवृत्ती अरिंगळे, दत्तूपंत डुकरे, प्रेरणा बलकवडे, निलेश गाढवे, भारत घोटेकर, हभप अशोक काळे, डॉ. गुणवंत डफरे, कृष्णा काळे, मनोहर कोरडे, सुनील आहिरे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘तुकाराम महाराज निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच ‘राम’ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन, आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना ‘जगदगुरू’ असे संबोधले जाते. तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महानभाग्य त्यांना लाभल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button