Raj Thackeray Nashik : गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की… | पुढारी

Raj Thackeray Nashik : गटबाजी फक्त आमच्याच पक्षात नाही, फक्त फरक इतकाच की...

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क ; – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून काल त्यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी  प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शाखाप्रमुखांसोबत बैठक घेऊन कडक शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत. पक्षात असलेल्या अंतर्गत गटबाजीवरुन त्यांनी एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, अन्यथा मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल असा इशाराच काल दिला. (Raj Thackeray Nashik)

आज राज ठाकरे यांना पक्षातील अतंर्गत गटबाजीवरुन पुन्हा विचारले असता ते म्हणाले, गटबाजी प्रत्येक पक्षात असते. सत्तेतील दिसत नाही, विरोधी पक्षातील दिसते.  आमचा उघडा कारभार असल्याचे चटकन दिसते. आता लोकसभा निवडणुका आहेत. त्या जाऊद्या नंतर विधानसभा, महानगरपालिका निवडणूक आल्यावर तुम्हाला कळेल. काल, गटबाजीचे एक इंजेक्शन पदाधिकाऱ्यांना दिले आहे असे राज ठाकरे म्हणाले.

आज (दि. 2) त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेतली असून विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले. सध्या मतदारसंघात चाचपणी करतोय, क्षातर्फे प्रत्येक मतदारसंघातून निवडणूक लढवली जावी असे लोक सांगत आहेत. दोन अडीच महिन्यांपासून आमची लोकं मतदारसंघात जाऊन येत आहेत. माहिती घेत आहेत. कुठे निवडणूक लढवली पाहिजे. कुठे नाही, या संदर्भात चाचपणी सुुुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे जर मविआसोबत आले तर घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर प्रकाश आंबेडकर निमंत्रण न देता आले असे राऊत म्हणाले होते. त्यासंदर्भात राज ठाकरेंना विचारले असता, यांच्याकडे कोण जाईल. मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील सांगता येत नाही. यांचा काही भरवसा आहे का? यांच्याकडे कोण जाईल? इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते. ते कुठे गेले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

अयोद्धेला जाणार का?

अयोद्धेला जाणार का? असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले, सध्या तिकडे खूप गर्दी आहे. तीन हजार पोलिस आणि दहा लाख रोजचे भाविक असे आहे. अशात कसे जाणार. सगळे शांत झाले की जाऊ अयोद्देला ,तोपर्यंत नाशिकचे काळाराम मंदिर आहेच असेही ते म्हणाले.

पंतप्रधान पदाचा चेहरा कोण वाटतो?

मी मागच्या वेळेला, नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा अशी इच्छा असल्याचे म्हटले होते. ते काही माझे भाकित नव्हते. यावेळेचा चेहरा कोण असेल यासंदर्भात चाचपणी सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

मागच्या वेळेला रागातून मतदान

प्रत्येक निवडणूक वेगळी असते. त्यामुळे शाश्वत ठोकताळे नसतात. त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र,  मागच्या वेळेला जे मतदान झाले ते रागातून मतदान झालं होत. 2014 ला पण रागातून झालेलं मतदान होत, आता समाधानातून किती मतदान होतं हे आपल्याला पाहावे लागेल. आजवर प्रश्नावर निवडणूका झाल्या, आता उत्तरावर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने पाहू असे राज ठाकरे म्हणाले.

हे भाजपला परवडणार नाही

ईडी, सीबीआय कारवाई संदर्भात विचारले असता, अशा प्रकारचे राजकारण भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी जन्माला येत नाही. पुन्हा सत्ता बदल झाल्यावर भाजपला याची परतफेड करावी लागेल. असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button