ऐकावं ते नवलंच ! विद्यार्थ्यांच्या प्रेमप्रकरणांची गुरुजींना डोकेदुखी | पुढारी

ऐकावं ते नवलंच ! विद्यार्थ्यांच्या प्रेमप्रकरणांची गुरुजींना डोकेदुखी

संतोष वळसे पाटील

मंचर : उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी  यांची प्रेमप्रकरणे चांगलीच बहरत आहेत.  ही प्रकरणे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यास पालक पोलिस ठाण्यात न जाता विद्यालयात कुटुंबासह जाऊन याचा जाब शिक्षकांना विचारत आहेत. यामुळे अनेक माध्यमिक विद्यालय,  उच्च माध्यमिकमधील शिक्षकांच्या डोक्याला ताप झाला आहे. कोरोना काळात शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक महाविद्यालय बंद होती. त्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवत होते. याच काळात अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिले. बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार सर्व विषयांचा अभ्यास हा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने शाळा, माध्यमिक विद्यालयापासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे.
 एकीकडे मोबाईलचा वापर अभ्यासासाठी होत असला तरी अनेकदा त्याचा गैरवापरदेखील होत असल्याचे या प्रेमप्रकरणांमधून दिसत येत आहे. मोबाईलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांचे मोबाईल नंबर मिळवत त्या माध्यमातून एकमेकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच एकमेकांच्या संमतीने प्रेमप्रकरण होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारणे, एकमेकांशी बोलणे असे प्रकार घडत आहेत. हा सर्व प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर मुला-मुलींच्या कुटुंबात वाद निर्माण होत आहेत. अनेक कुटुंबातील पालक पोलिस ठाण्यात न जाता थेट पाल्य शिक्षण घेत असलेल्या विद्यालय, उच्च माध्यमिक महाविद्यालयात जाऊन शिक्षकांनाच याबाबत जाब विचारत आहेत, ही शिक्षकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
पालक भांडतात महाविद्यालयात 
खरं तर अशा प्रकरणात पोलिस ठाण्यात जायचे सोडून मुला-मुलींचे पालक हे विद्यालयात येऊन एकमेकांबरोबर भांडताना दिसतात. त्यांची भांडणे सोडवताना शिक्षकांना नाकीनऊ येत आहे. असे प्रकार इयत्ता 9 वी ते 12 वी तसेच कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालयातील  विद्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात घडू लागल्याने पालकांसह शिक्षकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे.
पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षक, गुरुबद्दल आदर-मानसन्मान होता. मात्र गेल्या काही वर्षात शिक्षकांचा विद्यार्थी मानसन्मान ठेवत नाहीत. अनेकदा वर्गात शिक्षकांना उलटे बोलणे, त्यांची टिंगल-मस्करी करणे, अरे-तुरे करण्याचे प्रकार घडत आहेत. विद्यालयातील विद्यार्थी चार-पाच मुलांचा ग्रुप करून तासनतास मैदानावर टिंगल-मस्करी करताना दिसत आहेत. यामुळे भविष्यात या तरुण पिढीचे काय होणार हीच चिंता आहे.
                                                                                      अजयशेठ घुले, पालक, मंचर

Back to top button