तुटलेल्या रेलिंगमुळे अपघाताचा धोका; महापालिका प्रशासनाचे समस्येकडे दुर्लक्ष | पुढारी

तुटलेल्या रेलिंगमुळे अपघाताचा धोका; महापालिका प्रशासनाचे समस्येकडे दुर्लक्ष

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा : पौड रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी भुसारी कॉलनीजवळील एनडीएच्या मुख्य मार्गावर उभारण्यात आलेले लोखंडी रेलिंग तुटले आहेत. तर काही ठिकाणचे रेलिंग काढून टाकण्यात आले आहे. रेलिंगच्या तुटलेल्या तारा पादचार्‍यांना लागत असून, वाहनचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेलिंगअभावी या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुतर्फा लोखंडी रेलिंग महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होते. परंतु, सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी लोखंडी रेलिंग तुटले असून, काही ठिकाणी त्यांची दुरवस्था झाले आहे. रेलिंग तुटलेल्या ठिकाणी फायबरचे बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत. मात्र, वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक वेळा वाहने धडकेने फायबरचे बेरिकेटची दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.

महापालिका प्रशासनामार्फत कोथरूड डेपो ते लोहिया पार्क व कोथरूड डेपो ते भारतीनगरच्या सिग्नलपर्यंत लोखंडी पाईपचे रेलिंग बसविण्यात आले आहे. पौडरोड परिसरात बहुतांश ठिकाणी वाहनांची धडक असून या रेलिंगची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी तर रेलिंगच उभारलेले नाहीत. परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल असल्याने नागरिकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील रेलिंग बसवावेत आणि दुरवस्था झालेल्या रेलिंगची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या रस्त्यासाठी नवीन रेलिंग बनले आले असून, ते लवकरात लवकर बसवण्यात येतील. तसेच दुरवस्था झालेल्या रेलिंगची दुरुस्त केली जाईल.

– शैलेश वाघोलीकर, अभियंता, महापालिका

पौड रोडवर तुटलेल्या रेलिंगमुळे लहान-मोठे अपघात होत असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ज्या ठिकाणी रेलिंग नाहीत, त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीने नवीन बसवावे. तसेच तुटलेले रेलिंगदेखिल लवकरात लवकर दुरुस्त करण्याची गरज आहे.

– राजाभाऊ जोरी, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा

Back to top button