भटके-विमुक्तांची नावे आता मतदारयादी, शिधापत्रिकेत; विशेष मोहीम राबविणार | पुढारी

भटके-विमुक्तांची नावे आता मतदारयादी, शिधापत्रिकेत; विशेष मोहीम राबविणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सतत भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांची आता मतदार यादीत नोंद करण्यात येणार आहे. यासोबतच शिधापत्रके तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. याबाबतची एक अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे.

भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्व घटकातील मतदारांचा समावेश व्हावा, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यात त्यांनी भटके विमुक्त प्रवर्गात मतदार नोंदणी व शिधापत्रके वाटपासाठी विशेष मोहिम राबविण्याची विनंती केली होती. याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत भटक्या विमुक्त जातीमधील सुटलेल्या नावाची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील भटके विमुक्त जमातीच्या उत्थानासाठी अनेक योजना असल्या तरी देखील त्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूळ दस्तऐवज नसल्याने सरकारी योजनांचा विशेषत: अन्न सुरक्षा योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. त्यांना लाभ मिळावा, यासाठी बावनकुळे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने अधिसूचना काढून १५ जानेवारी ते १४ मार्च २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सुचना सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या दोन्ही निर्णयामुळे भटके विमुक्तांना लोकशाहीच्या बळकटीकरणात सहभागी होता येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या अन्न व सुरक्षा योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळविणे शक्य होणार आहे.

हेही वाचा :

 

Back to top button