

पुढारी ऑनलाईन डेस्क: आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड आज (दि.५) सकाळी टाकली. यानंतर विरोधी पक्षातून नाराजीचा सूर उमटला. दरम्यान महाविकास आघाडीने 'हा पळून जाणारा दादा नाहीये' असा इशारा सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील तपास यंत्रणांना दिला आहे. या संदर्भातील पोस्ट मविआने त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे. (MVA On Rohit Pawar)
मविआने पोस्टमध्ये म्हटले आहे की, संघर्ष यात्रा आणि पवार साहेबांच्या सोबत उभ राहण्याचे फळ…रोहित दादांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ED ची धाड. सरकारी यंत्रणा वापरून दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना एकच सांगणे आहे, "हा पळून जाणारा दादा नाहीये..!" असे मविआने सत्ताधारी सरकार आणि सरकारी तपास यंत्रणांना खडसावून सांगितले आहे. (MVA On Rohit Pawar)
तुम्ही कितीही प्रयत्न करा… रोहितदादा तुम्हाला पुरून उरणार म्हणजे उरणारच..! असे देखील महाविकास आघाडीने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (MVA On Rohit Pawar)
रोहित, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य तयार करत असतो. लढायचं – भिडायचं! #झुकेंगे_नहीं! असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी रोहीत पवार यांना दिला आहे.
रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की,रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल. अशी प्रतिक्रीया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार रोहित पवार यांच्या ॲग्रो कंपनीवर ईडीने टाकलेल्या धाडीवर दिली आहे.
आज युवा आमदार रोहित दादा पवार यांच्या कंपनीवर केंद्रीय यंत्रणांची धाड पडल्याची बातमी समजली. युवकांच्या प्रश्नावर अत्यंत तळमळीने आवाज उठवून रोहीत दादांनी राज्यात आपला झंझावात निर्माण केला व शासनाला अन्यकारक कंत्राटी भरती सहीत अनेक निर्णय मागे घायवे लागले. गेल्या काही महिन्यांपासून रोहित दादांवर विविध पद्धतीने कारवाई करून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संघर्षाच्या काळात आम्ही रोहित दादांच्या सोबत आहोत . यातून रोहित दादा अधिक सक्षम होऊन बाहेर पडतील या बाबत माझ्या मनात शंका नाही. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित आर. पाटील यांनी दिली आहे.