स्वच्छता अभियान : विटा-खानापूर अव्वल, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान | पुढारी

स्वच्छता अभियान : विटा-खानापूर अव्वल, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

विटा; पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियान मध्ये सांगली जिल्ह्याचा डंका वाजला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सांगली जिल्ह्यातील विटा आणि खानापूर शहरांना आज शनिवारी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. ही तमाम जिल्हावासियांना दृष्टीने अभिमानाची बाब आहे. स्वच्छता अभियान स्पर्धेत विट्याने संपूर्ण देशात पहिला तर खानापूरने राज्यात पहिला आणि देशात २२ वा नंबर पटकावला आहे.

या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणस्पर्धेत नंबर पटकाविलेल्या पहिल्या २२ शहरांचा २० नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान झाला. यात विटा शहर हे स्वच्छतेत देशामध्ये अव्वल ठरले. लोणावळा दुसरे तर सासवड शहर तिसरे आले.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही बाब कौतुकाचे ठरली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार करता खानापूर आणि विटा या दोन शहरांचे हे उज्ज्वल यश जिल्हावासियांच्या दृष्टीने अभिमानाचे ठरले आहे. यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशभरातील ४ हजार ३२० शहरांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध निकषांवर शहराचे मूल्यांकन करण्यात आले.

यामध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी व सार्वजनिक भागाची नियमित स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना व नागरिकांचा सहभाग व जनजागृति, 3R प्रणाली, १०० टक्के कचरा वर्गीकरण, कलेक्शन व प्रोसेसिंग, होम कम्पोस्टिंग, नाले- तलाव व्यवस्थापन व स्वच्छता, अशा अनेक स्वच्छताविषयक या घटकांचा समावेश आहे.

हे सर्व घटक शहराच्या सर्वांगीण विकासाला पोषक असून याद्वारे संपूर्ण शहराचा शाश्वत विकास होण्यास मदत होते. हे सगळे निकष विटा शहराने पूर्ण केलेत शिवाय कचरामुक्त शहर व हागणदारी मुक्त शहर ODF ++ आदी नामांकने देखील मिळवली आहेत. शहर कचरा कुंडी मुक्त, कचरा मुक्त, प्लास्टिक मुक्त व हागणदारीमुक्त झालेली आहेत. या स्पर्धेत सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीही पारितोषिके दिली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील विटा आणि खानापूर सह विजेत्या २२ शहरांमधील नगरपालिकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान महाराष्ट्रातील विटा, लोणावळा आणि सासवड या पहिल्या तीन पुरस्कार प्राप्त नगर पालिकातील प्रत्येकी चार प्रतिनिधींना देशाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

विटा पालिकेच्यावतीने स्वच्छते चे ब्रँड ॲम्बेसिडर वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, सफाई कामगार शांताबाई हत्तेकर आणि मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी हे पारितोषिक आणि सन्मान पत्र स्वीकारले तर खानापूर नगरपंचायतीलाही एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात २२ व्या व्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

या खानापूरचा महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक आला आहे. आज दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये खानापूरलाही पारितोषिक मिळाले आहे.

नगराध्यक्षा स्वाती टिंगरे, सत्ता धारी गटाचे नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहासनाना शिंदे, माजी नगराध्यक्ष तुषार मंडले आणि मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Back to top button