खा. अमोल कोल्हे अचानक पुन्हा मतदारसंघात सक्रिय | पुढारी

खा. अमोल कोल्हे अचानक पुन्हा मतदारसंघात सक्रिय

सुषमा नेहरकर-शिंदे

शिवनेरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अचानक मतदारसंघात सक्रिय झाल्याने जनताच काय पण कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. चक्क मतदारसंघातील अनेक वास्तूशांती,साखरपुडा, लग्न, दशक्रिया अशा कार्यक्रमांना गेली साडेचार वर्षांत कधीही न दिसलेले खासदार या कार्यक्रमांना ही येऊ लागल्याने मतदारसंघात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
गेले चार-साडेचार वर्षे केवळ जुन्नर, हडपसर भागात वावरणारे डॉ.कोल्हे सध्या आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील आदिवासी व दुर्गम भागातील गावांना भेट देत असल्याने मतदारांना निवडणूक आल्याची चाहूल लागली आहे. शिरूर लोकसभेत बहुतेक सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, या सर्व आमदार व पदाधिका-यांनी या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे खासदार कार्यक्रमांसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारीदेखील गेल्या चार वर्षांत अनेकवेळा केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

डॉ.अमोल कोल्हे गावाला आले की, जुन्नर तालुक्यातील एखादे दोन कार्यक्रम करणे आणि पुण्यात असतील, तर हडपसर भागात एखादा दौरा करणे एवढ्या पुरताचा मतदारसंघाशी संपर्क ठेवत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघ क्षेत्रफळ, मतदार संख्येच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभेत येतात. खासदार कोल्हे गेले चार वर्षांत या विधानसभा मतदारसंघात फारसे लोकांना दिसलेच नाहीत. डॉ.कोल्हे भाजपमध्ये जाणार, अशी सतत चर्चा होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर सुरुवातीचे दोन दिवस खासदार अजित पवार गटासोबत होते,आता शरद पवार गटाकडे आहेत; परंतु शरद पवार गटाने घेतलेल्या अनेक कार्यक्रम, बैठकांकडेदेखील त्यांनी पाठ फिरवली.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात घेतलेल्या सर्वच आंदोलनांकडे कोल्हे यांनी जाणीवपूर्वक पाठ फिरवली, तर राष्ट्रवादी फुटीनंतर पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातदेखील कोल्हे यांच्यामध्ये संभ—म असल्याचे जाणवत होते; परंतु गेले एक-दीड महिन्यापासून खासदार डॉ.अमोल कोल्हे पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय होताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या वास्तुशांती, श्रीसत्यनारायण पूजा, विविध दुर्घटना झालेल्या कुटुंबांचे घरी जाऊन सांत्वन करणे, आदिवासी भागात भात काढणी करणा-या शेतक-यांच्या शेतात जाणे, आंबेगाव-खेड तालुक्यांतील आदिवासी गावांचा दौरा, एस.टीने प्रवास, गावांमधील मंदिर, काकड आरतीला उपस्थिती लावण्यासोबतच काही विकासकामांची प्रत्यक्ष पाहणीदेखील त्यांनी केली.

Back to top button