आयुक्तालयातील ‘या’ मानाच्या रांगेतूनही परमबीर सिंग हद्दपार | पुढारी

आयुक्तालयातील ‘या’ मानाच्या रांगेतूनही परमबीर सिंग हद्दपार

मुंबई, पुढारी ऑनलाईन

मुंबई पोलिस आयुक्त म्हणून निवृत्ती अथवा बढती मिळाली की, त्या आयुक्तांचा फोटो आयुक्तालयात लावला जात असला तरी परमबीर सिंग हे गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याने त्यांचा फोटो हद्दपार केला आहे. शिवाय तो फोटो लावण्यास जागा शिल्लक नसल्याचेही आयुक्तालयाचे म्हणणे आहे. परमबीर सिंग हे आयुक्तालयाच्या मानाच्या परंपरेतून हद्दपार झाल्याचे चित्र सध्या तरी आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून आयुक्तालयाच्या पुरातन वास्तूत छायाचित्राच्या स्वरूपात मिळणारा मान हा परंपरेचा भाग आणि अभिमानाचा आहे. मात्र, मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करणाऱ्या परमबीर सिंह यांची प्रतिमा मात्र आयुक्तालयात लावण्यात आलेली नाही. अन्य माजी आयुक्तांचे फोटो लावून उरलेली जागा अपुरी असल्याने तेथे फोटो लावलेला नाही, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. मात्र, परमबीर सिंग हे अजून फरार आहेत. तसेच त्यांच्या कृतीने मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब झाल्याने पोलिस दल त्यांच्यापासून अंतर राखून आहे. जागा नसल्याचे कारण दिले असले तरी ते अनेक गुन्ह्यांतील आरोपी आहेत. त्यांना फरार घोषित केले असून ते कोर्टात हजर झाले नाहीत तर त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाणार आहे.

काय आहे प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर अज्ञाताने स्फोटके ठेवली होती. या स्फोटक प्रकरणाचा तपास सुरू असताना मनसुख हिरेन यांची हत्या झाली. त्यानंतर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड महासंचालक म्हणून करण्यात आली. त्यानंतर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. देशमुख यांना याप्रकरणी पद गमवावे लागले होते. सिंग यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.

काय आहे परंपरा

आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यानंतर किंवा पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर त्या आयुक्तांचा फोटो आयुक्तालयात लावण्यात येतो. काळ्या रंगाच्या लाकडी चौकटीत समान आकारात लावला जातो. मुंबईचे पहिले पोलिस आयुक्त जे. एस. भरुचा यांच्यापासून ते संजय बर्वे अशा ४२ तत्कालीन आयुक्तांची छायाचित्रे मुंबई पोलिस आयुक्तालयात लावली आहेत. मात्र, बर्वे यांच्यानंतर आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारलेले परमबीर सिंग यांचे छायाचित्र या रांगेत लावलेले नाही. ज्या भिंतीवर फोटो लावले आहेत तेथे जागा शिल्लक नाही. शिल्लक जागा कमी असल्याने तेथे फोटो बसत नाही. त्यामुळे नवीन जागेत फोटो लावला जाईल, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button