

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपण मुख्यमंत्री असतो तर शिक्षक, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावेच लागले नसते, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. छत्रपती शिवरायांच्या भूमीतून गद्दारांना हाकला, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज (दि. १२) भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला. यशवंत स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात काय काय झाले ते तुमच्या समोर आहे. आज मी मुख्यमंत्री नाही, जर सध्या मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावरही आंदोलन करण्याची वेळच आली नसती असेही ठाकरे म्हणाले. हजारो कोटींचा चुराडा करून हे पळून गेले. आज तुम्हाला हक्काचे देताना सरकार विचार करतेय, खोकेबाज सरकार तुम्हाला न्याय देईल असे वाटते का? अच्छे दिन, 15 लाख आले नाहीत. त्यामुळे मतपत्रिकेने निवडणूक झाल्यास कोट्यावधी कर्मचारी सरकार विरोधात जाणार ही कल्पना राज्य, केंद्र सरकारला आहे.
माझा पक्ष, निवडणूक चिन्ह चोरले. मी मुख्यमंत्री असतो तर निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज मी काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलो आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, तुमच्या या लढ्यात शिवसेना प्रत्येक पावलावर सहभागी होईल अशी उद्धव ठाकरे यांनी ग्वाही यावेळी दिली.