Nashik Onion News : निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको | पुढारी

Nashik Onion News : निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको

वणी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे वणी उपबाजारातील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी कळवण चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.

वणी उपबाजारातील गुरुवारी कांद्याला प्रतवारी व दर्जानुसार 4500 रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. गुरुवारी 45 रुपये किलो दराने शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला होता. तो आज शुक्रवारी 10 रुपये किलो दराने विक्री करावा लागला आहे. निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव अर्ध्याहून अधिक घसरले आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कळवण चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनास दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड आणि संचालक गंगाधर निखाडे यांनी बाजार समितीच्या वतीने पाठिंबा दिला. त्यांनी सपोनि निलेश बोडखे यांना निवेदन देऊन सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध केला.

बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. यामुळे दहा ते वीस टक्के इतकेच लाल कांद्याचे पिक शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असताना केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत.

हेही वाचा :

Back to top button