भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक | पुढारी

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये डॉक्टरकडून २० लाख रुपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.१) ही कारवाई केली. अंकित तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर, दिंडीगुल जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (DVAC) ईडीच्या मदुराई कार्यालयात झडती घेतली.

अंकित तिवारीच्या निवासस्थानाचीही अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या प्रकरणाच्या तपासात मदुराई आणि चेन्नईतील आणखी अधिकारी या प्रकरणात गुंतल्याचे दिसून आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंकित तिवारी अनेकांना ब्लॅकमेल करत होता आणि त्यांच्याकडून करोडोंची लाच घेत होता. तो इतर ईडी अधिकाऱ्यांनाही लाच देत होता, असेही सूत्रांनी सांगितले. त्याच्याकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या संदर्भात मदुराई आणि चेन्नईच्या कार्यालयात ईडीच्या आणखी अधिका-यांची चौकशी केली जाऊ शकते.

२९ ऑक्टोबर रोजी अंकित तिवारीने दिंडीगुलमधील एका डॉक्टरकडून त्याच्या विरुद्धच्या DVAC खटल्याच्या संदर्भात संपर्क साधला होता, जो बंद करण्यात आला होता. त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ईडीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. अंकित तिवारीने त्या डॉक्टरला पुढील तपासासाठी ३० ऑक्टोबरला मदुराई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. त्यादिवशी तिवारीने तपास बंद करण्यासाठी त्याच्याकडून 3 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर असे सांगितले की आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आणि लाच कमी करून ५१ लाख रुपये देण्याचे मान्य केले.

१ नोव्हेंबर रोजी संबंधित डॉक्टरने ईडी अधिकाऱ्याला २० लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. नंतर ईडीच्या अधिकाऱ्याने त्याला संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. ही रक्कम उच्च अधिकाऱ्यांमध्ये सामायिक करावी लागेल असे सांगितले. पैसे न दिल्यास त्याला कारवाईची धमकीही दिली. डॉक्टरने ३० नोव्हेंबर रोजी तिवारी याच्याविरूद्ध DVAC च्या दिंडीगुल युनिटमध्ये तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की अंकितने ED अधिकारी म्हणून त्याच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. शुक्रवार अंकित तिवारी याला २० लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button