तेलंगणातील धरणावर आंध्रच्या पोलिसांचा ताबा | पुढारी

तेलंगणातील धरणावर आंध्रच्या पोलिसांचा ताबा

हैदराबाद; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील पाण्याचा वाद चिघळला असून आंध्र पोलिसांच्या 400 जणांच्या तुकडीने तेलंगणातील नागार्जुनसागर धरणाच्या निम्म्या भागावर चक्क ताबा मिळवला. इतकेच नव्हे तर उजव्या कालव्यातून पाणीही सोडले. यावेळी दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये जोरदार वादावादी व धक्काबुक्कीही झाली.

नलगोंडा पोलिसांनी सांगितले की, नागार्जुनसागर धरण तेलंगणाच्या सिंचन विभागाच्या अखत्यारीत येते. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तेलंगणा स्पेशल प्रोटेक्शन फोर्सकडे आहे. या उलट श्रीशैलम धरण आंध्र प्रदेशच्या सिंचन विभागाच्या अखत्यारीत येते आणि आंध्र पोलिसांकडे त्याची जबाबदारी आहे. तेलंगणा राज्य मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणुकीच्या धामधुमीत असताना रात्री एकच्या सुमारास आंध्र प्रदेश पोलिसांच्या 400 जणांच्या तुकडीने नागार्जुनसागर धरणावर प्रवेश करीत चक्क निम्मे धरण ताब्यात घेतले. यावेळी आंध्र पोलिसांची तेलंगणा पोलिसांशी जोरदार वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्यावर दोन्ही राज्यांच्या पोलिसांची धक्काबुक्कीही झाली. या नंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी चक्क धरणातून पाणी सोडायला सुरुवात केली. हे सारे पाणी उजव्या कालव्यातून आंध्र प्रदेशात गेले.

 

पाणीवाटपाचा वाद जुनाच
तेलंगणा व आंध्र यांच्यातील पाणीवाटपाचा वाद खूप जुना आहे. याबाबत दोन्ही राज्ये कायम लवादात अथवा कोर्टात जात असतात. 2015 साली धरणावर कब्जा घेण्याचा असाच एक प्रयत्न झाला होता. त्यावेळी आंध्र पोलिसांची तुकडी धरणावर येत असताना तेलंगणाच्या गे्रहाऊंड या पोलिस दलाने तेथे धाव घेत त्यांना रोखले होते.

Back to top button