Mizoram Assembly Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मिझोरमच्या मतमोजणीचे वेळापत्रक बदलले | पुढारी

Mizoram Assembly Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मिझोरमच्या मतमोजणीचे वेळापत्रक बदलले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Mizoram Assembly Election : मिझोराम विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतमोजणीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने बदलले आहे. आता मिझोरमसाठीची मतमोजणी ३ डिसेंबर ऐवजी सोमवारी ४ डिसेंबर रोजी होईल.

यापूर्वी, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरम या पाचही राज्यांसाठी मतमोजणी तीन डिसेंबरला होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. मात्र, ख्रिस्तीधर्मियांचे बाहुल्य असलेल्या मिझोरममध्ये रविवार हा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा दिवस असल्याने मतमोजणीचा दिवस बदलावा, अशी मागणी करणारी निवेदने निवडणूक आयोगाकडे आली होती. त्यांचा विचार करून हा बदल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. (Mizoram Assembly Election)

मिझोरमच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. या राज्यात सत्ताधारी एमएनएफ, कॉंग्रेस आणि झेडपीएम या तीन पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी चुरस असून एक्झिट पोलमध्ये राज्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Back to top button