Pandharpur : श्री विठ्ठल-रुक्मिणी देवाचे सोने-चांदीचे दागिने वितळले जाणार | पुढारी

Pandharpur : श्री विठ्ठल-रुक्मिणी देवाचे सोने-चांदीचे दागिने वितळले जाणार

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा

गोरगरीब भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवाच्या (Pandharpur) चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यात येणार आहेत. याकरिता मंदिर समितीने सरकारच्या न्याय व विधी विभागाला सुमारे १९ किलो वजनाच्या सोन्याच्या आणि ४२५ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवण्यात येणार आहे. त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यास सरकारने परवानगी दिली आहे.

कार्तिकी यात्रेनंतर मुंबई येथील रिफायनरीत सोने वितळवण्याचे काम सरकारने निर्देश दिल्यानुसार केले जाणार आहे. अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. (Pandharpur)

श्री विठूरायाचे राज्यभरातून, परराज्यातून व देशभरातून भाविक दर्शनाला आल्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात. मंदिरात १९८५ पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान- लहान वस्तू, दागिने अर्पण केले आहेत. समितीला हे सर्व दागिने आणि वस्तू पोत्यात भरून ठेवायची वेळ आली आहे. हे सोने चांदीचे दागिने वितळविण्यात येणार आहेत. यास सरकाने परवानगी दिली आहे.

कार्तिक यात्रेनंतर २० ते २५ नोव्हेंबरच्या दरम्यान मुंबई येथे सोने-चांदी वितळविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या लहान वस्तू आणि दागिने वर्षानुवर्षे साठवून ठेवण्यात आले आहेत. अशा सोन्याच्या वस्तू एकत्र करून त्यांची वीट तयार करावी. अशी भूमिका मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली होती.

२०१५ पासून त्या संदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार सुरू होता. २०१८ मध्ये सरकारने परवानगी दिली होती. परंतु प्रत्यक्षात कार्यवाहीला उशिर झाला. यातच कोरोना काळामुळे ते रेंगाळत राहिले.

नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत देवाला घालण्यासाठी त्या सोन्या-चांदीतून अलंकार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मंदिर समितीचे माजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या बदलीनंतर नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. आणि संबंधितांशी बोलणे देखील केले होते. आता सरकारने मंदिर समितीस सोने- चांदी वितळविण्यास परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर २० ते २५ नोव्हेंबरच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

सरकारने या प्रक्रियेसाठी न्याय व विधी विभागाचे सहसचिव सुभाष कर्‍हाळे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह समितीचे तीन सदस्य, कार्यकारी अधिकारी हे वितळवण्यासाठीच्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांची यादी अंतिम करतील.

पंढरपूर (Pandharpur) येथून मुंबईत सरकारच्या रिफायनरीमध्ये सोने- चांदी जमा केले जाणार आहेत. तेथे सोने- चांदीची तपासणी करून त्याच्या नोंदी करून वितळवून त्याच्या विटा तयार केल्या जातील.

वितळवलेल्या सोन्या- चांदीपासून कोणते दागिने बनवायचे याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. गोरगरीब भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचे दागिने आता विटांच्या रुपात देवाच्या खजिन्यात कायमस्वरुपी राहणार आहेत.

सोने चांदी वितळवून बनवणार विटा

मंदिर समितीकडे एकूण २८ किलो वजनाचे सोन्याचे अलंकार आहेत. त्यापैकी जुने दागिने तसेच ठेवण्यात येणार आहेत. एकूण २८ किलो सोन्यापैकी सुमारे १९ किलो सोन्याचे छोटे दागिने (अंदाजे किंमत २ कोटी ९५ लाख) आणि वस्तू आणि एकूण ९९६ किलो चांदीपैकी ४२५ किलो चांदी (अंदाजे किंमत १ कोटी २० लाख) वितळवण्यात येणार आहे. तर उर्वरित ५७१ किलो चांदीचा वापर देवासाठी केला जाणार आहे.

Back to top button