Ganesh Utsav : भक्तांची हाक बाप्पा ऐकणार, पुढच्या वर्षी लवकर येणार; दाते पंचांगकर्त्यांची माहिती | पुढारी

Ganesh Utsav : भक्तांची हाक बाप्पा ऐकणार, पुढच्या वर्षी लवकर येणार; दाते पंचांगकर्त्यांची माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ganesh Utsav : गणपती बाप्पा मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, एक-दोन-तीन-चार गणपतीचा जयजयकार, अशा जयघोषात, ढोल-ताशाच्या गजरात, मिरवणूक काढत गणेश चतुर्थीला घरोघरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. लाडक्या बाप्पांसाठी घरोघरी विशेष आरास करण्यात आली. गणपतीसाठी विशेष मखर सजवून त्यात श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बाप्पांच्या आगमनाने प्रत्येकाच्या घरातील वातावरण चैतन्यमयी आनंददायी बनले. गणेश उत्सवासाठी लहान मुलांमध्ये तर विशेष उत्साह पाहायला मिळतो.

संबंधित बातम्या :

गणेश चतुर्थीला गणेश स्थापना झाली त्यासोबतच सोनपावलांनी गौराई देखील आली. गौरी गणपतीच्या आगमानाने घराघरात फराळाची रेलचेल, गौराईसाठी खास पारंपारिक खाद्यपदार्थांचे नैवेद्य, तर लाडक्या बाप्पांसाठी लाडू आणि मोदक, असा सर्व थाटमाट होता. बाप्पांच्या सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळी पारंपारिक मोदकांसह वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक प्रसादासाठी ठेवण्यात आले. यावर्षी बाप्पांसाठी पारंपारिक उकडीच्या मोदकांसह, चॉकलेट, गुलकंद, आंबा, केसर, काजू अशा विविध फ्लेवरमधील मोदक बाजारात होते. तर लाडूंमध्ये रवा, बुंधी, मोतीचूर असे विविध प्रकारचे लाडू मार्केटमध्ये होते. याच्या जोडीला घराघरात फराळासाठी चकली, चिवडा, करंजी बनवण्यात आले.

Ganesh Utsav : घरगुती आणि 5 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

गणेश स्थापनेपासून 5 दिवस लाडक्या गणरायाला भक्तिभावाने, आग्रहाने नैवेद्य समर्पण केल्यानंतर निरोप देताना सर्वांचेच मन भरून येते. भक्तांना बुद्धी, समृद्धी प्रदान केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या गावाला जातात तेव्हा डोळ्यांच्या कडा नकळतच पाणवतात. जाण्यापूर्वी गणेश भक्त आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कार्यात येणारे विघ्न हरण्याची मनोमन विनंती करतात. सर्व कार्य सिद्धीस नेणारे गजानन श्री गणराय आपल्या सर्व भक्तांना काही ना काही देऊन पुन्हा आपल्या गावी निघतात.

गणपती बाप्पांची मनोभावे पूजा आरती करून 5 दिवसानंतर घरगुती बाप्पांना निरोप देताना एक-दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती निघाले गावाला, चैन पडेना जीवाला, असे म्हणत भक्तांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..असे भावपूर्ण साकडे घातले.

Ganesh Utsav : भक्तांची विनवणी बाप्पा ऐकणार; पुढच्या वर्षी लवकर येणार

बाप्पांना भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आणि पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घातल्यानंतर भक्तांची ही भावपूर्ण विनंती बाप्पा ऐकणार आहे. या वर्षी दोन श्रावण आल्याने बाप्पांचे आगमन उशिरा झाले. तर पुढच्या वर्षी बाप्पांचे आगमन 12 दिवस लवकर येणार आहे. पुढच्या वर्षी 2024 मध्ये 7 सप्टेंबर रोजीच होणार आहे. 2024 मध्ये श्री गणेश चतुर्थी शनिवारी 7 सप्टेंबरला येणार आहे, अशी माहिती दाते पंचागकर्त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button