पनवेल; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले सुभाष पुजारी यांनी मिस्टर एशिया बॉडी बिल्डिंग आणि मास्टर ओपन स्पर्धेत 2 कांस्यपदके पटकवून यश मिळवले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे आणि देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नेपाळ काठमांडू येथे नुकतीच 55 वी एशियन बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित स्पर्धेसाठी 22 देशांच्या संघाच्या 525 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या अटीतटीच्या सामन्यात सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 90 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळविले तसेच मास्टर ओपन गटामध्ये सुद्धा कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे आणि देशाचे नाव उंचावून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला आहे. त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेचे यशानंतर सुभाष पुजारी यांची 6 ते 12 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड या स्पर्धेसाठी भारतीय बॉडी बिल्डिंग संघातून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सचिव, विक्रम रोठे, वर्ल्ड बॉडीबिल्डींग लीगल अँडव्हायझर, प्रशांत आपटे, साऊथ एशिया बॉडीबिल्डींग संघटनेचे अध्यक्ष, पत्नी रागिणी पुजारी, आनंद गुप्ता आणि विवेक गुप्ता, संचालक, गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी, खालापूर, राईनोमेट हॉस्पिटल, अंधेरीचे डॉ. असीम माथन, डॉ. कनीष जैन आणि समीर दाभेलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी त्यांनी जुलै 2022 मध्ये मालदीव येथे झालेल्या मिं एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले आहे. ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले होते. तसेच ऑगस्ट 2023 मध्ये, कॅनडातील विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्समध्ये त्यानी रौप्य आणि कांस्य पदके जिंकली होती तसेच सलग तीनवेळा भारतश्री आणि महाराष्ट्रश्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक रजनीश शेठ, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसाळकर तसेच अन्य अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.