नितीन गडकरी ( संग्रहित छायाचित्र )
Latest
Nitin Gadkari: भारत- म्यानमार- थायलंड दरम्यानच्या रस्ते मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण – गडकरी यांची माहिती
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भारत, म्यानमार आणि थायलंड या तीन देशांना जोडणाऱ्या रस्ते मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भारत ते थायलंड दरम्यानचा हा रस्ते मार्ग सुमारे 1400 किलोमीटर लांबीचा आहे. वरील महामार्ग पूर्ण झाल्यानंतर भारत रस्ते मार्गाने दक्षिण पूर्व आशियाशी जोडला जाईल. यामुळे व्यापार, आरोग्य, शिक्षण तसेच पर्यटन क्षेत्रात नवी कवाडे उघडली जाणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
भारतातील मणिपूरमधील मोरेह ठिकाणाहून हा रस्ता सुरु होईल. म्यानमारमार्गे तो थायलंडमधील माई सोट या ठिकाणी थांबेल. संपूर्ण रस्ता बनून तो कधीपासून परिचालनात येईल, याचा निश्चित कालावधी अद्यापपर्यंत सरकारने दिलेला नाही. आधीच्या नियोजनानुसार हा रस्ता डिसेंबर 2019 पासून सुरु होणार होता, तथापि प्रकल्पाचे काम लांबल्याने रस्ता सुरु होण्यास विलंब लागणार आहे.
पश्चिम बंगालमार्गे हा रस्ता गाठायचा असेल तर प्रवाशांना कोलकाता ते सिलिगुडी असा प्रवास करावा लागेल, त्यानंतर आसाममधील दिमापुरमार्ग नागालँडमध्ये प्रवेश करावा लागेल. येथून मणिपूरमधील इंफाळजवळच्या मोरेहला जावे लागेल. म्यानमारमधील मांडले, नैप्यीडॉ, बागो, यंगून, म्यावाडी अशी शहरे करीत हा रस्ता थायलंडमध्ये जाणार आहे.

