Nitin Gadkari : वाढती लोकसंख्या, वाहन संख्येवर नितीन गडकरींची मिश्किल टीका | पुढारी

Nitin Gadkari : वाढती लोकसंख्या, वाहन संख्येवर नितीन गडकरींची मिश्किल टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात ४१ कोटी वाहने झाली आहेत. लोक कमी आणि वाहने जास्त होतील अशी वेळ येत्या काळात येईल, अशी मिश्किल टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या लोकसंख्येसह वाढत्या वाहनांच्या गर्दीवर केली. राजधानी दिल्लीसह हरियाणातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी बांधला जात असलेल्या द्वारका एक्सप्रेस-वे च्या प्रगती कार्याचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केले.

गडकरी पुढे म्हणाले, ऑटोमोबाईल क्षेत्रात दरवर्षी १० टक्क्यांची वाढ होतेय. लोकसंख्या देखील वाढत आहे. विकासानुसार नवनवीन कल्पना अंमलात आणल्या जातील. दिल्लीत देशाचे हृदय आहे. पंरतु, राजधानीत प्रदूषण आणि वाहतूक समस्या जास्त आहे. या समस्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयाकडून ६५ हजार कोटींचे कामे केली जात असून यातील २५ हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ३३ हजार कोटींची प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. येत्या काळात ६ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल, असे गडकरी म्हणाले.

देशात पहिल्यांदाच द्वारका एक्सप्रेस-वे साठी ७२० केव्हीची विजेची लाईन स्थानांतरित करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात हा एक्सप्रेस-वे पुर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. एक्सप्रेस-वे च्या कार्याच्या पाहणीदरम्यान गडकरी यांच्यासोबत दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह, केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंही, खा. प्रवेश सिंह वर्मा, खा. रमेश बिधुडी उपस्थित होते.

द्रुतगती मार्गाची खासियत

९ हजार कोटीं रुपयांचा निधी खर्चून २९.६ किलोमीटर लांब हा देशातील पहिला ‘एलिवेटेड’ ८ पदरी एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस-वे आहे. महामार्गाच्या बांधकामात आतापर्यंत २ लाख मॅट्रिक टन स्टील आणि २० लाख टन क्रॉंक्रीट चा वापर करण्यात आला आहे.हरियाणातील १८.९ किलोमीटर ‘सिंगल पीलर’वर ३४ मीटर रुंद आणि दिल्लीत १०.१ किलोमीटर लांब हा एक्सप्रेस-वे बांधला जात आहे. देशातील सर्वात रुंद ३.६ किलोमीटर लांबीचा ८ पदरी भूयारी मार्ग असलेल्या या एक्सप्रेसवेमुळे हरियाणा आणि दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

धमक्यांना घाबरत नाही

गडकरींना गेल्या काळात खंडणीसाठी जीवेमारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यासंबंधी प्रश्न विचारला असता ‘मी त्यावर काही बोलू इच्छित नाही. धमकी खुप गंभीर स्वरुपाची नाही आणि मी धमक्यांची चिंता करीत नाही’ अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली.

Back to top button