सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; शरद पवारांची मोठी घोषणा | पुढारी

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; शरद पवारांची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या  २५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा आज (दि.१०) केली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांची जबाबबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे  देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र, हरियाणा, महिला, युवक- युवती, आणि लोकसभेची जबाबदारी सप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी २५ वर्षांच्या सहकार्यासाठी सर्वांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला. या २४ वर्षात पक्षाला अनेक परिस्थितीचा सामना करावा लागला. २४ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली. नागालँड या महत्वपूर्ण राज्यातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करून आपले उमेदवार जिंकले. या सरकारच्या काळात सध्या एक दिवसही असा जात नाही की, देशात कुठे ना कुठे अत्याचार होत आहे. अल्पसंख्यांक, महिलांवर अत्याचार होत आहेत. भारतीय जनता पार्टी अधिकारांचा गैरवापर करत आहे. देशात आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

देशातील तरूणांपुढे सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे. तरूणांना रोजगाराची संधी मिळत नाही. देशात ९ वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. पण जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत भाजपचा पराभव होत आहे. देशात बदल होत आहे. अनेक राज्यांनी भाजपला दूर ठेवलं आहे. देशात परिवर्तन करायचं असेल, तर संघटन मजबूत करायला पाहिजे. २३ जून रोजी सर्व विरोधक बिहारमध्ये एकत्र येत आहेत. सर्वांनी मिळून काम करूया आणि देशात परिवर्तन घडवूया, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीला नवीन दोन कार्यकारी अध्यक्ष

शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यपदाची जबाबदारी दिली आहे. देशात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी काही लोकांवर नवीन जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पवार म्हणाले. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांच्या विधानसभेची जबाबबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर दिली आहे. तर महाराष्ट्र, हरियाणा, महिला, युवक- युवती, आणि लोकसभेची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी सुनिल तटकरे यांच्यावर देखील ओडिशा, प. बंगाल या राज्यांसह निवडणूक आयोगाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न याची जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button