जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार | पुढारी

जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

मंदिरे ही हिंदू धर्माची ऊर्जा केंद्रे आहेत. मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी, तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकाला मंदिरातील पवित्रकांचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगावमध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत दि. ३१ मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर जळगावमधील प्रसिद्ध देवस्थान सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी, पारोळा येथील श्री बालाजी मंदिर यांसह अनेक मंदिरानी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. त्यासंदर्भात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने  दि. ५ जूनला पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये श्री बालाजी मंदिर, पारोळा; श्री मनुदेवी मंदिर, यावल; श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल या मंदिरांसह ३४ हून अधिक मंदिरात येत्या आठवड्यात तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या ३ महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषीत करण्यात आले आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी. -प्रशांत जुवेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक.

हेही वाचा:

Back to top button