किल्ले रायगड : शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे लोकोत्सव : संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती
Published on
Updated on

किल्ले रायगड ; इलियास ढोकले साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता. आज राज्याभिषेकाचा हा केवळ सोहळा राहिलेला नसून, तो लोकोत्सव झाला आहे असे प्रतिपादन रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. किल्ले रायगडावर आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्‍याभिषेक संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित लाखो शिवभक्तांना संभाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले.

शासनाने राज्यातील 50 किल्ले आपल्या ताब्यात द्यावेत. शासनाकडून यासंदर्भात संवर्धनासाठी एक रुपयाही न घेता आम्ही स्वखर्चाने या किल्ल्यांचे संवर्धन करू असे त्‍यांनी सुचित केले. छत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचा ताबा देखील केंद्रीय पुरातत्त्व खात्याने रायगड प्राधिकरणाकडे द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी राजदरबारातून शासनाकडे केली आहे. शिवराज्याभिषेक समितीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या तारखेनुसारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून सुमारे चार लाख शिवभक्त उपस्थित होते.

सकाळी राजदरबारात सुरू झालेल्या या मुख्य सोहळ्या दरम्यान आमदार रोहित पवार, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बंटी उर्फ सतेज पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांसह सर्व पदाधिकारी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या सुमारे सव्वीस मिनिटांच्या भाषणामध्ये संभाजीराजे यांनी छत्रपतींचे विविध गुण आपल्या जीवनामध्ये यायला हवेत असे स्पष्ट करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन टक्के गुण जरी आपणामध्ये आले तरी जीवन सार्थक झाले असे म्हणावे लागेल असे उद्गार काढले.

सर्व शिवभक्तांनी सामाजिक अथवा राजकीय क्षेत्रातील असो राजांना अभिप्रेत असलेली कामे करणे अपेक्षित असल्याचे त्‍यांनी सांगितले. छत्रपतींच्या काळातील मावळा, सरदार, सरसेनापती व अष्टप्रधान मंडळामध्ये देखील येऊ शकतो. हा विश्वास त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये रुजविला होता. राजांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा असून, शासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच पाचाड येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी 50 कोटी रुपये घोषित केल्याचा उल्लेख करून त्याचे स्वागत केले. यावेळी राजांच्या शिवकाळातील 300 किल्ल्यांबाबत विचार करणे अपेक्षित होते असे मत नोंदविले. शासनाकडून एक रुपयाही न घेता 50 किल्ले आम्हाला दत्तक द्यावेत, त्याचे संवर्धन आम्ही करू असे त्यांनी जाहीर केले. शिवभक्त जनता व मावळे मागे राहणारे नसून, ज्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने आपण किल्ले रायगडावर जल्लोषामध्ये उपस्थित राहिला. या ऐतिहासिक लोकोत्सवाची स्मरण ठेवत घरी जातानाही जल्लोषात सर्व समितीच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित घरी जावे असे आवाहन त्यांनी उपस्थित लाखो शिवभक्तांना केले.

किल्ले रायगडावर गेल्या चार दिवसांपासून शाहिरी मर्दानी आखाडे, सांस्कृतिक कलाकार यांनी सादर केलेली लोककला कामी एक रुपयाही मानधन घेतलेले नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच यापेक्षा शिवभक्त अजून बरेच देऊ शकतो असे मत त्‍यांनी नोंदविले. सन 2007 साली तारखेनुसार हा सोहळा आपण सुरू केला. त्या वेळेला काही हजार शिवभक्त होते. आज चार लाख शिवभक्त किल्ल्यावर व किल्ल्याच्या खाली उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून चांगली कामे केली जात असून, पुढील वर्षी पाणीटंचाई संदर्भात कोणतीही समस्या शिल्लक राहणार नाही असे त्यांनी नमूद केले.

स्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन उत्सव सोहळा संपन्न होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. संभाजीराजे कुटुंबियांसह रायगडावर दाखल झाले आहेत. 350 व्या राज्याभिषेक निमित्ताने मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झाले आहेत. 350 व्या राज्याभिषेकाचा उत्साह पाहून संभाजीराजे छत्रपती भावुक झाले. मी तर एक निमित्त आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. हा फक्त शिवराज्याभिषेक सोहळा नाही तर उत्सव बनला आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news