नाशिक : वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूदच नाही; जिल्हा प्रशासनाने केले हातवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढवारीचे २ जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायचे मोबाइल स्वच्छतागृह व स्नानगृहासाठी निधीची तरतूद नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने हातवर केल्याचे समजते आहे.
दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून आषाढवारीसाठी निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होते. त्यामुळे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या धर्तीवर वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर संस्थानाकडून करण्यात आली होती. संस्थानाकडून तसे निवेदनच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह मोबाइल स्नान व स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य पथक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाकडून नाशिक जिल्हा प्रशासनाला चालू आर्थिक वर्षात अद्याप एकही रुपया प्राप्त झालेला नाही. परिणामी वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची तरतूद करणे शक्य होणार नसल्याने तूर्तास संस्थानाच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने असमर्थता दर्शविल्याची माहिती मिळते आहे. यामुळे पंढरीतील विठुरायाच्या भेटीसाठी मजल-दरमजल करत पायी प्रवास करणाऱ्या हजारो वारकऱ्यांची यंदाची वारी खडतर बनण्याची शक्यता आहे.
शासनाकडे निधीची मागणी
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तत्काळ हा निधी मिळावा, असा मागणीपर प्रस्ताव विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांकडे सादर केला. शासनाकडून वेळेत निधी मिळाल्यास मोबाइल्स स्वच्छतागृहे व अन्य सुविधा देता येणार आहेत. अन्यथा यंदाही वारकऱ्यांना असुविधांचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा:
- Janhvi Kapoor : फक्त व्हाईट शर्ट घालून जान्हवीचा तलावात विहार
- पुणे : पालखी सोहळ्यातील वाहनांना टोल माफी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
- बटरफ्लाय चित्रपट : वैशाली भैसने माडेच्या आवाजात “कोरी कोरी झिंग हाय गं”