पुणे : पालखी सोहळ्यातील वाहनांना टोल माफी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन | पुढारी

पुणे : पालखी सोहळ्यातील वाहनांना टोल माफी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरमध्ये प्रवेश करताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोलनाका उभा केला आहे. वारी काळात मोठ्या प्रमाणात पालख्यांच्या वाहनांची वर्दळ होणार असून, या वाहनांना टोल माफ करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी वारकर्‍यांकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून आषाढी काळात वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

पालखी सोहळा आढावा बैठक गुरुवारी (दि. 25) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, पुणे- पंढरपूर पायी वारी सोहळ्यानिमित्त पालखीतळाची जागा, विसावा, पाण्याची सोय, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था, रस्ता रुंदीकणासाठी रखडलेले भूसंपादन आणि इतर कामांच्या नियोजनासंदर्भात राव यांच्या अध्यक्षतेखाली अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन स्वतंत्र समित्या स्थापन करून नियोजन करावे, असा आदेश दिल्याचेही पाटील यांनी या वेळी सांगितले.

नियोजन करण्यासाठी दोन वारकरी, देवस्थानचे अध्यक्ष आणि सोहळाप्रमुख यांची संयुक्त समिती स्थापन करून नियोजन करावे, असा आदेश दिला. कायमस्वरूपी पालखीतळ, विसाव्यासाठीचे भूसंपादन, पालखी सोहळा संपल्यानंतर पालखीमार्गावर झाडे आणि स्वच्छ्ता आदी नियोजन करावे. त्यासाठीदेखील आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दीर्घकालीन समिती स्थापन करून सर्व प्रश्न सोडविण्यात येतील, अशी स्पष्टोक्ती पाटील यांनी दिली.

दोन दिवसांत अतिरिक्त जागा द्या

पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात वारकर्‍यांची मोठी उपस्थिती असून, विविध सोहळे पार पाडतात. त्यामुळे ही जागा अपुरी पडत असून, अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देत दर्शनमंडप मोठा करावा, असे आदेश पाटील यांनी दिले.

झाडांच्या संगोपनासाठी समिती

रस्ता रुंदीकरणामुळे दोन्ही मार्गांवरील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. यासाठी दोन्ही मार्गांच्या कडेने झाडे लावावीत आणि त्याचे संगोपन करण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना आळंदीच्या विश्वस्तांनी केली. त्याला सौरभ राव यांनी तत्त्वतः मान्यता दिली. तसेच 10 हजार वृक्षलागवडीचे नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
‘नमामी इंद्रायणी – चंद्रभागा’
केंद्र सरकारतर्फे ‘नमामी गंगे’ अंतर्गत नद्या प्रदूषणमुक्त करण्यात येत आहेत. पंढरपुरात सोहळा संपल्यानंतर चंद्रभागेचे प्रदूषण होत असून ‘नमामी इंद्रायणी – चंद्रभागा’ अभियान राबविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.

पालखी मार्गावर मंडप उभारा

दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकर्‍यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. पुणे शहरात महानगरपालिकेने पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालयांची व्यवस्था आदींसाठी मंडप टाकण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातही पालखी तळ आणि विसाव्याच्या दरम्यान अशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

आषाढी वारी सोहळा-2023 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. ऑनलाइनद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले,पालखी मार्गावर उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो, यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत.

घाटात आंतररुग्ण कक्षाची स्थापना

दिवे घाटाची चढण झाल्यानंतर भाविकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन झेंडेवाडी घाटात 10 खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून, कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. ’डायल 108’ सेवेच्या एकूण 30 आणि 102 सेवेच्या एकूण 110 रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या असून, दुचाकीवरून सेवा देण्यासाठी 39 आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. 87 बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण 24 पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, 33 औषधोपचार उपकेंद्रे, 2 फिरते वैद्यकीय पथके अशी 146 पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज केली आहेत.

आषाढी वारी अ‍ॅप

पालखी सोहळ्यामध्ये येणार्‍या नागरिकांना आवश्यक माहिती व मदत मिळण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. या अ‍ॅपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्त्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

Back to top button