नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु | पुढारी

नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा

बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे.

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 पासून सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल, असा दावा करतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 631 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत 03 ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आतापर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीसांनी एकुण 19 बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे.

” ऑपरेशन अक्षता”

या उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्य असलेले गाव पातळीवरील महत्वाचा घटक म्हणजे पोलीस पाटील यांची “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम सुरु झ आल्यापासून महिन्याच्या दर मंगळवारी बैठक घेण्यात येत असते. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या आजपर्यंत 120 बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच पुढील काळात पोलीस ठाणे येथे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारच्या बैठकीत स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य असलेले ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीट अंमलदार यांच्या देखील बैठका घेण्यात येणार आहेत. तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा दुय्यम पोलीस अधिकारी पोलीस ठाणे हद्दीत दररोज एका गावाला भेट देवून गावातील नागरिकांनी बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यातील नंदुरबार शहर- 02, नंदुरबार तालुका 10, उपनगर 06, नवापूर 06, विसरवाडी-06, शहादा-08, धडगांव 06, सारंगखेडा- 06, म्हसावद- 07, अक्कलकुवा- 07, तळोदा-08, मोलगी- 06 पोलीस ठाणे हद्दीतील एकुण 78 गावांना भेटी देवून ऑपरेशन अक्षता या उपक्रमाची जनजागृती बाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button