पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद | पुढारी

पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद

पिंपळनेर (ता.साक्री) :पुढारी वृत्तसेवा
साक्री शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा कोणताच धाक चोरट्यांना राहीला नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे. बुधवार (दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत शहरातील विविध ठिकाणी तब्बल पाच दुकानांना टार्गेट करत पोलिसांपुढे एक आव्हान दिले आहे.

शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून बुधवार (दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच दुकानांना टार्गेट केले. विशेष म्हणजे दोन दुकाने तर पोलीस ठाणे परिसरात होती. तर मार्केटमधील दुकानांना फोडण्याचा अयशस्वी प्रयत्नही चोरट्यांनी केला. एका ठिकाणी चोरटे दुचाकीने जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व्यवसायिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय पोलिसांच्या कारभारावर सर्वसामान्यांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महामार्गावरील कोर्टाजवळील प्रवीण भामरे यांच्या मालकीचे साईदीप टी अँण्ड कोल्ड्रींक्स हे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील कोल्ड्रींक्स, बिस्कीट, सिगारेट असा सुमारे तीन ते चार हजारांचा माल चोरुन नेला. तर याच दुकानाजवळील एका चहाच्या टपरीचेही कुलूप तोडले. दुकानाचे कुलूप फोडले असून या टपरीतून काहीही चोरीस गेलेले नाही. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा मार्केटकडे वळविला. लक्ष्मीरोडवरील चित्राई कृषी सेवा केंद्राला फोडण्याचा प्रयत्न केला. या दुकानाची दोन कुलूपे तोडली. परंतु, मेनलॉक न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. तर बोरसे गल्लीतील बापू भोई यांच्या मालकीचे सैलानी चना फुटाणे या दुकानेचेही कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी सोनार गल्लीतही हातसफाई करण्याचा प्रयत्न केला. येथील एका सुवर्ण कारागिराच्या दुकानाचे लॉक चोरट्यांनी तोडले. परंतु चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

तर गुरुवार (दि.25) सकाळी चोरीच्या सर्व घटना उघडकीस आल्या. व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे. विशेष म्हणजे कोर्टाजवळील जी दोन दुकाने फोडली तेथून काही अंतरावरच पोलीस ठाणे आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी होत असताना पोलीस करतात तरी काय? असा संतप्त सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे. गुरुवार (दि.25) सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी उशीरापर्यंत घटनास्थळी भेट दिलेली नव्हती. उशीराने बोरसे गल्लीतील सैलानी चूना फुटाना दुकानाला भेट देऊन सोपस्कार पार पाडले. एका ठिकाणी हे चोरटे दुचाकीवरुन जाताना कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, दुपारी उशीरापर्यंत चोरीच्या घटनांबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

हेही वाचा:

Back to top button