धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल | पुढारी

धुळ्यात बारावीच्या परीक्षेत मुलीच वरचढ, जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यंदा देखील धुळे जिल्ह्यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून धुळे जिल्ह्याचा निकाल 92.29 टक्के लागला आहे. यावर्षी देखील महिला शक्तीच वरचढ ठरली असून जिल्ह्यात मुलींचा 94.42 टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा 90.68 टक्के निकाल लागला आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यातून 13485 मुले तर 10 हजार 153 मुली अशा एकूण 23 हजार 638 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातून 13,348 मुले तर 10 हजार 65 मुली अशा 23413 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला. यातून 12,104 मुले तर 9504 मुली असे 21 हजार 608 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांची टक्केवारी 90.68 तर मुलींची 94.42 अशी आहे. जिल्ह्याचा निकाल 92.29 टक्के लागला आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका हा अव्वल ठरला असून शिरपूर तालुक्याचा 95.70 टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्याचा 93.34 टक्के,शिंदखेडा तालुक्याचा 90.72 टक्के, धुळे महानगरपालिका 92.39 टक्के तर धुळे तालुक्याचा 89.95 टक्के निकाल लागला आहे. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी आज विद्यार्थ्यांनी संगणक केंद्रांवर गर्दी केली होती. तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवरच निकाल पाहून जल्लोष केला.

हेही वाचा:

Back to top button