राष्‍ट्रवादीचा ‘आप’ला पाठिंबा, आमची लढाई लोकशाही वाचवण्यासाठी : शरद पवार | पुढारी

राष्‍ट्रवादीचा 'आप'ला पाठिंबा, आमची लढाई लोकशाही वाचवण्यासाठी : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत, यावर चर्चा करण्याची वेळ नाही. आज देशातील लोकशाहीवर आघात हाेत आहे. केंद्र सरकारने अध्यादेश काढून दिल्ली सरकारच्या अधिकारांवरच गदा आणली आहे. या प्रश्‍नी आम्ही अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करतो. आता आमची लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अआज  (दि.२५) संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने दिल्‍ली सरकारच्‍या अधिकारावर गदा घालणार्‍या अध्यादेशानंतर केजरीवाल देशातील विरोधी पक्षांना या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. आज त्‍यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आयाेजित संयुक्त पत्रकार परिषदेवेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आप खासदार संजय सिंह, पंजाब मुख्यमंत्री भगवंतसिंह मान, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदी  उपस्थित होते.

या वेळी शरद पवार म्‍हणाले, “सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेले आदेश धुडकावत केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकार हिरावून घेतले आहेत. आता देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या प्रश्‍नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करताे. दिल्लीतील राजभवन भाजपचे कार्यालय झाले आहे. संवादाने सर्व प्रश्न सुटतात. मात्र भाजप सरकारने सर्व संवादचं बंद केले आहेत. आमच्या सर्वांसमोर राष्ट्रीय प्रश्न सोडवणे याला प्राधान्य आहे.”

केजरीवाल म्हणाले, “२०१५ मध्ये दिल्लीत आम आदमी पार्टीचे  सरकार स्थापन झाले. तेव्हापासून केंद्र सरकारविरोधात आम्ही न्यायालयात लढत आहोत. दिल्लीच्या सरकारला स्वतंत्रपणे काम करण्याचा अधिकार असायला हवा. केंद्र सरकारकडून दिल्लीच्या लोकांवर अन्याय होत आहे. आम्ही देशातील प्रत्येक पक्षाकडे जात आहोत. केंद्र सरकारने अध्यादेश काढून दिल्लीच्या लोकांवर अन्याय केला आहे. दिल्लीच्या लोकांसाठी आम्ही मदत मागत आहोत.”

भाजप स्वायत्त संस्थांचा वापर करुन भाजप राज्यात सत्ता बळकावत आहे.  ज्‍यh राज्‍यांमध्‍ये भाजपची सत्ता नाही, तेथे राज्यपालांचा हस्तक्षेप वाढवला जातो, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. आम्ही देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी शरद पवारांना सर्व पक्षांना या विधेयकाबाबत आवाहन करण्याची विनंती करतो, असे आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केले.

हेही वाचा :

Back to top button