करंजी (नगर), पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामसभेमध्ये बुधवारी तरुणांनी विविध विकासकामांच्या मुद्याकडे सत्ताधार्यांचे लक्ष वेधले. करंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बर्यापैकी मार्गी लागलेला आहे. जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीटंचाईचा प्रश्न निश्चितपणे सुटेल, असा विश्वास सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी व्यक्त केला.
मारुती मंदिर सभामंडपात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अकोलकर होते. माजी सभापती मिर्झा मणियार, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, माजी उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, उपसरपंच नवनाथ आरोळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाडेकर, राहुल अकोलकर, रोहित अकोलकर, सोन्याबापू दानवे यांच्यासह कृषी, आरोग्य, महसूल, अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आठवडे बाजारासाठी सध्याची जागा कमी पडत असून पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे आठवडे बाजार मंगल कार्यालय परिसरातील पटांगणामध्ये हलविण्यात यावा, त्याचबरोबर जुन्या बायपास रस्त्याची जागा पूर्णपणे मोकळी आहे, त्या ठिकाणी पार्किंग होऊ शकते. त्यामुळे त्या भागात आता बाजार हलविण्यात यावा, तसेच जुन्या बायपास रस्त्यावर पथदिवे बसविण्यात यावेत, लालबावट चौकाचे सुशोभीकरण करावेस अशा मागण्या छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी केल्या. माजी उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे यांनी सांगितले, की जलसिंचन योजनेच्या कमिटीचे सचिव बदलण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यामुळे कमिटीने नेमलेला सचिव ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी मागणी केली. त्यानंतर ग्रामस्थांनीच उपस्थित ग्रामस्थांनीच जबाजी अकोलकर यांनी सचिवपदाचा दिलेला राजीनामा नामंजूर करत त्यांनाच पुन्हा या पदावर काम करण्याची विनंती केली. त्यानंतर सचिवपदाच्या विषयावर पडदा पडला.
हाडोळा वस्ती रस्ता काँक्रीटीकरणासह नवीन पूल बांधणे, तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे विश्वास क्षेत्रे यांनी लक्ष वेधले. भटेवाडी परिसरामध्ये जलजीवन योजनेच्या पाईपलाईनचे काम अर्धवट राहिलेले असून ते पूर्ण करण्यात यावे, तसेच प्रत्येक कुटुंबाला या योजनेच्या पाण्याचा लाभ मिळावा. त्याचबरोबर भट्टेवाडीकडे रस्त्याचे कामे अर्धवट आहे ते तत्काळ पूर्ण करण्यात यावे, तसेच करंजी बस स्टॅन्डजवळील देशी दारूचे दुकान दोन-तीन किलोमीटर हलवण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यावर ग्रामपंचायतीने काय उपाययोजना केल्या, याकडेही सूरज क्षेत्रे यांनी सत्ताधार्यांची लक्ष वेधले. अनेक युवकांनी गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधारी गटाचे लक्ष वेधले.
यावेळी सरपंच अकोलकर म्हणाले, मागील साडेचार वर्षांत अनेक विकासकामे मार्गी लावली असून विकास आराखड्याच्या नियोजनानुसार सुमारे 80 टक्के कामे केली असून, रस्ते, पाणी, वीज यासह वैयक्तिक लाभाच्या योजनांना देखील प्राधान्य दिले आहे. राहिलेली उर्वरित कामेदेखील पूर्ण करू. त्यासाठी ग्रामस्थांचे देखील सहकार्य महत्त्वाचे आहे. विकासकामात कोणीही आडकाठी आणू नये. यावेळी त्यांनी विकासकामांची यादी जनतेसमोर वाचून दाखवली.
माजी सभापती मिर्झा मण्यार यांनीदेखील सरपंच अकोलकर यांच्या कारभाराचे कौतुक केले. अकोलकर यांच्यामुळे मागील साडेचार वर्षांत गावात शांतता नांदली, अनेक विकासकामे मार्गी लागली, असे ते म्हणाले. हनुमंत मोरे, पद्माकर क्षेत्रे, बबनराव अकोलकर, फिलीप क्षेत्रे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. ग्रामविकास अधिकारी भास्करराव काळापहाड यांनी आभार मानले.
ग्रामपंचायतीची सुमारे वीस लाख रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी थकली असून त्यात प्रतिष्ठित व धनदांडग्यांचा समावेश आहे. त्यांना नोटिसा द्याव्यात अन्यथा त्यांची नावे गावकर्यांसमोर जाहीर करा, अशी मागणी युवा नेते विवेक मोरे यांनी ग्रामसभेत केली. त्यामुळे घरपट्टी-पाणीपट्टी थकवणारे प्रतिष्ठित कोण याचीदेखील उत्सुकता गावकर्यांना आहे.